पिंपरी चिंचवड देशातील पहिली हरित कर्जरोखे जारी करणारी महापालिका; मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

 

मुंबई : पर्यावरणपूरक आणि शाश्वत शहरी विकास प्रकल्पांसाठी हरित कर्जरोख्यांच्या (ग्रीन बाँड्स) माध्यमातून निधी उभारणारी पिंपरी चिंचवड महापालिका ही देशातील पहिली महानगरपालिका ठरली आहे. ही केवळ पिंपरी चिंचवड शहरासाठीच नव्हे, तर राज्य सरकारसाठी देखील अभिमानास्पद बाब आहे, असे गौरवद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. आज मुंबई शेअर बाजारात (बॉम्बे स्टॉक एक्सचेंज) हरित कर्जरोख्यांच्या लिस्टिंगनिमित्त आयोजित बेल रिंगिंग समारंभात ते बोलत होते.

२०० कोटींचा निधी यशस्वीरित्या उभारला; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बेल रिंगिंग

पिंपरी चिंचवड महापालिकेने पर्यावरणपूरक आणि शाश्वत शहरी विकासाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत, हरित कर्जरोख्यांच्या माध्यमातून २०० कोटी रुपयांचा निधी यशस्वीरित्या उभारला आहे. या ऐतिहासिक यशानंतर मुंबई शेअर बाजारात आयोजित बेल रिंगिंग समारंभाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

या उद्घाटन प्रसंगी आमदार उमा खापरे, अमित गोरखे, महेश लांडगे, शंकर जगताप, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, डॉ. के. गोविंदराज, बृहन्मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगरानी, बीएसईचे व्यवस्थापकीय संचालक सुंदररामन राममूर्ती, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

गुंतवणूकदारांचा विश्वास; केंद्र सरकारकडून २० कोटींचे अनुदान

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पिंपरी चिंचवड महापालिकेने हरित कर्जरोखे इश्यू करताच पहिल्याच मिनिटात १०० कोटी रुपयांचा मूळ भाग भरला गेला. ही अभिमानास्पद गोष्ट असून, यावरून महाराष्ट्र सरकार व पिंपरी चिंचवड महापालिकेवर गुंतवणूकदारांचा असलेला विश्वास दिसून येतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्थानिक स्वराज्य संस्थांनी म्युनिसिपल बाँडद्वारे जास्तीत जास्त निधी उभारावा, यासाठी सातत्याने आग्रही असतात आणि यात पिंपरी चिंचवड महापालिकेने आघाडी घेतल्याचे त्यांनी सांगितले. बाँड लिस्टिंग करणे ही क्लिष्ट प्रक्रिया असून, यासाठी सहकार्य केलेल्या प्रत्येक संस्थेचे आणि व्यक्तीचे त्यांनी अभिनंदन केले.

हरित कर्जरोख्यांतून उभारला जाणारा निधी शहरात हरित सेतूसह विविध पर्यावरणपूरक प्रकल्पांसाठी वापरला जाणार आहे, ही देखील चांगली गोष्ट आहे. तसेच, कर्जरोख्यांतून निधी उभारण्यात आघाडी घेतल्यामुळे केंद्र सरकारच्या वतीने पिंपरी चिंचवड महापालिकेला २० कोटींचे अनुदान देखील प्राप्त होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

पर्यावरणपूरक विकासासाठी महत्त्वाचे पाऊल; इतरांसाठी आदर्श

आमदार शंकर जगताप म्हणाले की, पिंपरी चिंचवड महापालिकेने उभारलेल्या या निधीचा फायदा शहराच्या पर्यावरणपूरक विकासासाठी होणार आहे. भविष्यात अशाच पद्धतीने सामाजिक तसेच महापालिकेच्या इतर विकास कामांसाठी कर्जरोख्यांच्या माध्यमातून निधी उभारता येऊ शकतो का, या दृष्टीनेही प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे त्यांनी सुचवले.

राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेने उचललेले हे पाऊल कौतुकास्पद असल्याचे म्हटले. शहरीकरण झपाट्याने वाढत असताना पर्यावरणपूरक आणि शाश्वत शहरी विकास साधणे गरजेचे असून, हरित कर्जरोख्यांच्या माध्यमातून निधी उभारण्याचे पिंपरी चिंचवड महापालिकेने उत्तम उदाहरण इतरांसमोर ठेवले आहे, असे त्यांनी नमूद केले.

महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी या ऐतिहासिक टप्प्यावर आनंद व्यक्त करत, ही कामगिरी केवळ आर्थिकदृष्ट्या नव्हे, तर पर्यावरणपूरक व हवामानानुकूल नागरी विकासासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे सांगितले. गुंतवणूकदारांनी दाखवलेला विश्वास पिंपरी चिंचवडच्या शाश्वत भविष्याची पावती असल्याचे ते म्हणाले.

हरित कर्जरोख्यांबद्दल थोडक्यात:

पिंपरी चिंचवड महापालिका ही हरित कर्जरोख्यांद्वारे निधी उभारणारी महाराष्ट्रातील पहिली महापालिका ठरली आहे. महापालिकेच्या या इश्यूला गुंतवणूकदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, केवळ एका मिनिटात १०० कोटी रुपयांचा मूळ भाग भरला गेला. एकूण ५१३ कोटी रुपयांच्या निविदा प्राप्त झाल्या, म्हणजेच ५.१३ पट अधिक मागणी नोंदवली गेली. उभारलेला निधी निगडी प्राधिकरणातील हरित सेतू प्रकल्प आणि गवळीमाथा ते इंद्रायणी नगर चौक टेल्को रस्ता विकास प्रकल्पासाठी वापरण्यात येणार आहे. या इश्यूला क्रिसिल आणि केअर या पतमापन संस्थांकडून एए+ (AA+) पतमानांकन प्राप्त झाले असून, ७.८५ टक्के स्पर्धात्मक व्याजदर निश्चित करण्यात आला आहे.  



  •  Green Bonds, Municipal Corporation, Pimpri Chinchwad, Sustainable Development, Urban Development, Mumbai Stock Exchange, Devendra Fadnavis, Environmental Projects, Financial News, Maharashtra
  • #GreenBonds #PimpriChinchwad #PCMC #SustainableCities #UrbanDevelopment #BSE #DevendraFadnavis #MaharashtraDevelopment #EnvironmentalFinance #MarathiNews #SmartCities
पिंपरी चिंचवड देशातील पहिली हरित कर्जरोखे जारी करणारी महापालिका; मुख्यमंत्र्यांकडून कौतुक पिंपरी चिंचवड देशातील पहिली हरित कर्जरोखे जारी करणारी महापालिका; मुख्यमंत्र्यांकडून कौतुक Reviewed by ANN news network on ६/११/२०२५ ०६:२३:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".