विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या भूमिकेमुळे कंपन्यांच्या बेकायदेशीर धोरणांना लगाम बसणार : यशवंत भोसले
पिंपरी, ६ जून २०२५: राज्यभरातील हजारो अन्यायग्रस्त कामगारांच्या न्यायासाठी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे. कंपन्यांच्या बेकायदेशीर कामगार धोरणांविरोधात त्यांनी कडक भूमिका घेऊन विविध आस्थापनांशी तातडीने बैठका आयोजित केल्या आहेत अशी माहिती राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले यांनी आज ६ जून रोजी दिली. पिंपरीतील हॉटेल कलासागर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
भोसले म्हणाले, कोरोना काळात केंद्र सरकारने कामगारांना कामावरून काढू नये असे स्पष्ट आदेश दिले होते, तरीही पोलिबॉण्ड, राठी कंपनी, प्लास्टिक ओमनियम, लोकमान्य हॉस्पिटल आणि तुळजापूर देवस्थानसह अनेक संस्थांनी शेकडो कामगारांना बेकार केले. मुंबई उच्च न्यायालय आणि कामगार आयुक्तांच्या आदेशानंतरही गेल्या पाच वर्षांपासून या कंपन्या वेळकाढूपणा करत आहेत. राज्यभरातील अनेक कंपन्यांमध्ये कायमस्वरूपी नोकऱ्या रद्द करून कंत्राटी व हंगामी स्वरूपात कामगारांची नियुक्ती केली जात आहे. यामुळे सुशिक्षित तरुणांचे आयुष्य विस्कळीत होत आहे आणि न्यायासाठी त्यांना वर्षानुवर्षे न्यायालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. आता विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी या प्रश्नात लक्ष घातले आहे. त्यांनी या बाबत विविध आस्थापनांशी तातडीने बैठका आयोजित केल्या आहेत. शासनस्तरावर पुढील बैठकीसाठी संबंधित कंपन्यांचे निर्णयक्षम अधिकारी, पोलीस आणि कामगार विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. निर्णय न झाल्यास शासनाकडून थेट कारवाई केली जाईल, असा इशारा उपाध्यक्षांनी दिला आहे. या सरकारी पुढाकारामुळे कामगारांना न्याय मिळण्याची नवी आशा निर्माण झाली आहे.
भोसले पुढे म्हणाले की, टाटा मोटर्स फौंड्री, चिंचवड येथे कामादरम्यान पुष्पेंद्र कुमार (वय २६) या तरुणाचा मोठ्या जॉबखाली दबून मृत्यू झाला होता. या प्रकरणी उपाध्यक्ष बनसोडे यांनी गंभीर दखल घेऊन कंपनीने त्याच्या वारसांना देऊ केलेला फक्त सहा लाख रुपयांचा दावा फेटाळला आहे. मृताच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पुढील आर्थिक व शैक्षणिक मदतीचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच तुळजापूर देवस्थानच्या व्यवस्थापक व प्रांत अधिकाऱ्यांना कामावरून काढलेल्या कामगारांना आठ दिवसांत पुन्हा कामावर घेण्याचे आणि थकित वेतन अदा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. लोकमान्य हॉस्पिटलच्या कामगारांना कामावर घेण्यासाठी लवकरच आदेश काढणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
#WorkerJustice #LabourRights #MaharashtraAssembly #AnnasahebBansode #YashwantBhauBhosale #IndustrialInjustice #ContractLabor #COVID19Workers #EmploymentRights #Maharashtra

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: