भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशनचे आयोजन; पुणेकरांनी अनुभवला गीतांचा सूरमयी सोहळा
पुणे, दि. ७ जून २०२५: भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत ‘शुभांगी मुळे, पुणे’ प्रस्तुत ‘प्रेमाच्या गावा जावे’ हा भावगीतांचा कार्यक्रम आज सायंकाळी ५.३० वाजता भारतीय विद्या भवनच्या सरदार महादेव बळवंत नातू सभागृह, सेनापती बापट रस्ता येथे उत्साहात पार पडला.
प्रेमाचे विविध रंग उलगडणाऱ्या या कार्यक्रमात शुभांगी मुळे, हेमंत वाळुंजकर आणि अविनाश सलगरकर यांनी रसिक श्रोत्यांना भावविभोर करणारी गीते सादर केली. कार्यक्रमाची सुरुवात शुभंगी मुळे यांच्या 'विनायका हो सिद्ध गणेशा' या गीताने झाली. यानंतर 'विठू माऊली तू, माऊली जगाची,' 'लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई', 'या जन्मावर या जगण्यावर', 'सोनियाच्या ताटी', 'धुंदी कळ्यांना', 'शारद सुंदर चंदेरी', 'ग साजणी', 'शूर आम्ही सरदार' यांसारखी अनेक लोकप्रिय मराठी गीते, तसेच ‘ए माँ, तेरी सूरत से अलग भगवान की सूरत क्या होगी’, ‘ए मेरी जोहराजबी’ यांसारखी अनेक हृदयस्पर्शी हिंदी गीते सादर करण्यात आली. 'ने मजसी ने परत मातृभूमीला' या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. श्रोत्यांनी प्रत्येक गाण्याला टाळ्यांच्या गजरात भरभरून दाद दिली.
गायनाला जयंत साने (हार्मोनियम), तुषार दीक्षित (सिंथेसायझर), मोहन पारसनीस (तबला) आणि हेमंत पोटफोडे (तालवाद्य) यांची सुरेख साथ लाभली. नीना भेडसगावकर यांनी निवेदनाच्या माध्यमातून कार्यक्रमाची रचना अधिक प्रभावी केली.
या कार्यक्रमाला रसिक प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद लाभला. सभागृहात श्रोत्यांनी प्रेमरसात न्हालेल्या गीतांची मनापासून दाद दिली. विनामूल्य प्रवेश असलेला हा भारतीय विद्या भवनचा २४७ वा सांस्कृतिक प्रसार कार्यक्रम होता. भारतीय विद्या भवन पुणे केंद्राचे मानद सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि कलाकारांचा सत्कार केला.
#Pune #Bhavgeet #CulturalEvent #BharatiyaVidyaBhavan #InfosysFoundation #ShubhangiMule #MarathiSongs #HindiSongs #MusicConcert #PuneEvents

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: