'भक्ती आणि योग'च्या माध्यमातून आरोग्यदायी समाज निर्माण करूया: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 


 शेतकऱ्यांची कर्जमाफी योग्य वेळी होणार; मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिले आश्वासन

पुणे, २१ जून २०२५: योग आपली ऐतिहासिक परंपरा असून, संस्कृती आणि आनंददायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. भक्ती आणि योगाच्या माध्यमातून आरोग्यदायी, स्वस्थ समाजाची निर्मिती होणे गरजेचे आहे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात 'वारकरी भक्तीयोग' उपक्रमात केले. जागतिक योग दिनाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत लाखो वारकरी, विद्यार्थी आणि नागरिकांनी योगासने केली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी, श्री संत तुकाराम महाराज संस्थान देहू, पुणे महापालिका आणि राज्य सरकार यांच्या वतीने आयोजित 'वारकरी भक्तीयोग' कार्यक्रम पुणे शहरातील १२२७ ठिकाणी उत्साहात पार पडला. यात वारकरी, विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, कार्यकर्ते, योग प्रशिक्षक अशा साधारण लाखांहून अधिक जणांनी योगासने केली.

'आरोग्यदायी समाजाची' संकल्पना: 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, "योग हे आमचे प्राचीन ज्ञान असून, ते जगाने स्वीकारावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रात योग दिनाचा प्रस्ताव ठेवला. सर्व देशांनी पाठिंबा दिलेला हा संयुक्त राष्ट्राच्या इतिहासात एकमेव प्रस्ताव ठरला." गेल्या ११ वर्षांपासून जागतिक योग दिवस साजरा होत असून, योगासनामुळे शरीर, मन आणि शरीरातील सर्व चक्रांना पुनरुज्जीवित करत उभारी देण्याचे काम होते. योगासनाकडे उपचार शक्ती (Healing Power) आणि आरोग्यदायी जीवनशैली (Wellness) म्हणून पाहिले जाते, असेही त्यांनी नमूद केले. 'भक्तीयोग कार्यक्रमाच्या निमित्ताने पुण्याने एक अभिनव उपक्रम दिला असून, पंढरपूरच्या वारीमध्ये पुणेकर आणि वारकऱ्यांचा सहभाग असणारे भक्तीयोगाचे रिंगण हा एक नवीन आयाम प्रस्थापित होत आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.

उपस्थित मान्यवर आणि आयोजकांचे मत: 

यावेळी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, मनपा आयुक्त नवल किशोर राम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी, "एकाच वेळी भारत आणि जगातील जवळपास १० कोटी लोक योग करत असतील, ही अद्भुत बाब आहे. सुमारे हजार वर्षांपासूनच्या इतिहासातील योग, ध्यान, यज्ञाचे महत्त्व पुन्हा एकदा जगाच्या लक्षात आले असून, यातील विज्ञानाचे सर्व जग अनुसरण करत आहे," असे मत व्यक्त केले.

उपक्रमाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी प्रास्ताविकात सांगितले की, "योग हा पतंजली आणि गौतम बुद्धांनी या मातीत रुजवला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगात नेला." त्यांनी मुख्यमंत्र्यांना १३ कोटी जनतेच्या विकासाचे वारकरी संबोधले. या उपक्रमात पुण्यातील १८७ महाविद्यालये, सुमारे बाराशे प्राध्यापक आणि हजार विद्यार्थ्यांनी नियोजन केले. शहरातील बहुसंख्य मंदिरे, मठ, गुरुद्वारा आणि धार्मिक ठिकाणी हा उपक्रम राबवण्यात आला.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर मुख्यमंत्र्यांचे आश्वासन: 

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबतही वक्तव्य केले. "राज्य सरकारने जनतेला दिलेला एकही शब्द आजपर्यंत फिरवलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी योग्य वेळी करण्यात येणार आहे. कर्जमाफी करण्यासाठी सर्व गोष्टी तपासून पाहून निर्णय घेण्यात येणार आहे," असे आश्वासन त्यांनी दिले.

योग प्रशिक्षक डॉ. अनुराधा येडके आणि डॉ. पल्लवी कव्हाणे यांच्या पथकाने उपस्थित सर्वांकडून ताडासन, भुजंगासन, अर्धशलभासन, मकरासन, कपालभाती, अनुलोम-विलोम आदी आसने प्राणायाम करवून घेतले. जागतिक संगीत दिनानिमित्त अभंग गायनही करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य डॉ. संजय चाकणे आणि डॉ. सदानंद भोसले यांनी केले.

 International Yoga Day, Devendra Fadnavis, Chief Minister, Pune, Savitribai Phule Pune University, Warkari Bhaktiyoga, Sant Dnyaneshwar Maharaj Sansthan, Sant Tukaram Maharaj Sansthan, Chandrakant Patil, Madhuri Misal, Rajesh Pandey, Farmers' Loan Waiver, Yoga Benefits.

 #YogaDay #InternationalYogaDay2025 #Pune #DevendraFadnavis #WarkariBhaktiyoga #FarmersLoanWaiver #Maharashtra #Yoga #Bhakti #HealthForAll


'भक्ती आणि योग'च्या माध्यमातून आरोग्यदायी समाज निर्माण करूया: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'भक्ती आणि योग'च्या माध्यमातून आरोग्यदायी समाज निर्माण करूया:  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Reviewed by ANN news network on ६/२१/२०२५ ०६:०५:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".