पुणे: सिंहगड रोड परिसरातील लोकमान्य नगरमध्ये एका बंद फ्लॅटचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम आणि सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह एकूण २ लाख २२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. विश्रामबाग पोलीस ठाण्यात याप्रकरणी घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सिंहगड रोड येथे राहणाऱ्या ५० वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा लोकमान्य नगर येथील जॉगिंग पार्कजवळील बिल्डिंग क्रमांक ९ मधील फ्लॅट कुलूप लावून बंद होता. २ जून रोजी मध्यरात्री २ ते पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास, कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या फ्लॅटच्या मुख्य दरवाजाचे कुलूप कशाच्यातरी सहाय्याने उचकटून आत प्रवेश केला. चोरट्याने बेडरूममधील कपाटातील २५ हजार रुपयांची रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण २ लाख २२ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला.
सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर फिर्यादीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३०५, ३३१(३), ३३१(४) अन्वये घरफोडीचा गुन्हा नोंदवला आहे. आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किरण नरवडे करत आहेत. घर बंद करून बाहेरगावी जाताना मौल्यवान वस्तू घरात ठेवू नयेत आणि शेजाऱ्यांना माहिती देऊन सतर्क राहण्यास सांगावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------
#PuneCrime #Housebreaking #Burglary #Vishrambaug #SinhagadRoad #PuneNews
लोकमान्य नगरातील बंद फ्लॅट फोडला, २.२२ लाखांच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला
Reviewed by ANN news network
on
६/०३/२०२५ ०४:००:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: