खेड (रत्नागिरी): रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. फुरूस ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच, श्रीमती रुकीया लियाकत सनगे यांना विकासकामांमध्ये झालेल्या गंभीर प्रशासकीय आणि आर्थिक अनियमिततेमुळे त्यांच्या सरपंच आणि सदस्य पदावरून दूर करण्यात आले आहे. कोकण विभागाचे विभागीय आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम ३९(१) अंतर्गत ३० मे २०२५ रोजी हा आदेश पारित केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात १५ व्या वित्त आयोगांतर्गत 'दापोली रोड ते फुरूस दर्गा' या कामासाठी मंजूर करण्यात आलेल्या संरक्षण भिंतीच्या बांधकामात मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार आणि प्रशासकीय अनियमितता झाल्याचे विभागीय चौकशीत उघड झाले आहे. याबाबत गुलजार शरीफ परकार आणि अताउल्ला कमरूद्दीन तीसेकर, फुरूस येथील रहिवाशांनी तक्रार केली होती. गट विकास अधिकारी, पंचायत समिती खेड यांनी केलेल्या चौकशी अहवालानुसार, सरपंच सनगे यांच्यावर महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखा संहिता २०११ मधील नियम ५६ चा भंग करणे, निविदा प्रक्रिया न राबवणे, आणि तरतुदीपेक्षा अधिक खर्च करणे यासह अनेक गंभीर आरोप निश्चित करण्यात आले होते.
विभागीय आयुक्तांच्या आदेशात नमूद केल्यानुसार, सन २०२१-२२ मधील १५ व्या वित्त आयोगांतर्गत मौजे फुरूस पोयनार रोड ते नवाघर संरक्षण भिंत बांधणे या कामाची निविदा मंजूर होण्यापूर्वीच काम सुरू करण्यात आले होते, तसेच या कामासाठी आवश्यक पेपर निविदा काढण्यात आली नव्हती.
याशिवाय, जिल्हा वार्षिक जनसुविधा योजनेंतर्गत सन २०२२-२३ मध्ये 'फुरूस भुलेश्वर स्टॉप ते हलिमा परकार रस्ता बांधणे' आणि 'फुरूस मोहल्ला घर ते एफ. टी. सर घरापर्यंत रस्ता करणे' या कामांमध्ये करारनाम्यासाठी वापरलेला मुद्रांक (स्टॅम्प पेपर) खरेदीची तारीख ०४.०८.२०२३ असताना, करारनामा मात्र त्यापूर्वीच म्हणजेच २५.०७.२०२३ रोजी करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
या सर्व अनियमिततांमध्ये सरपंच श्रीमती रूकीया लियाकत सनगे आणि तत्कालीन ग्रामसेवकांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात आहे.
या कारवाईमुळे स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनात खळबळ उडाली असून, ग्रामविकास कामांमध्ये पारदर्शकता आणि जबाबदारीचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. भविष्यात अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी अधिक कठोर उपाययोजनांची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Gram Panchayat, Financial Irregularities, Sarpanch Disqualification, Khed Ratnagiri, Konkan Division, Corruption
#FurusGramPanchayat #SarpanchDisqualified #FinancialIrregularities #Khed #Ratnagiri #KonkanDivision #CorruptionInGP #GramPanchayatAct

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: