पुणे: शिक्रापूर-चाकण महामार्गावर शेल पिंपळगावजवळ झालेल्या एका अपघातात एका वृद्ध महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. पोलिसांनी टेम्पो चालकाला निष्काळजीपणे वाहन चालवल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी निखिल शंकर मोहिते (वय ३४ वर्षे, व्यवसाय शेती, रा. शेल पिंपळगाव, ता. खेड, जि. पुणे) यांची आजी विमल या ०२/०६/२०२५ रोजी सायंकाळी ७.३० ते ७.४५ वाजेच्या दरम्यान शेल पिंपळगावहून शिक्रापूर-चाकण हायवे रोडच्या विरुद्ध बाजूने पायी चालत सुदामा वजन काटाजवळ आल्या होत्या.
दरम्यान, शिक्रापूरच्या दिशेकडून येणाऱ्या एमएच-१६ सीसी-०६९५ क्रमांकाच्या आयसर टेम्पोच्या चालकाने निष्काळजीपणे आणि हयगयीने टेम्पो चालवत विमल यांना जोरदार धडक दिली. या धडकेत विमल यांच्या डोक्यावरून टेम्पोचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेनंतर टेम्पो चालक सलिम चीनीभुत मलिक (पत्ता माहित नाही) घटनास्थळावरून फरार झाला. शिक्रापूर पोलिसांनी निखिल मोहिते यांच्या तक्रारीवरून आरोपी चालकाविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम २७९, ३०४(अ), १३४, १७७, ११९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक वाडेकर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
-----------------------------------------------------------------------------------------
#RoadAccident #FatalAccident #Shikrapur #PuneCrime #NegligentDriving

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: