राज्यातील प्रकल्प रखडणार नाहीत याची दक्षता घ्या! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भूसंपादनाचे कडक निर्देश
मुंबई: राज्यातील महत्त्वाच्या सर्व प्रकल्पांचे भूसंपादन ठरलेल्या वेळापत्रकानुसार पूर्ण करून प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले आहेत. प्रकल्पांच्या भूसंपादनाचा आढावा घेण्यासाठी त्यांनी मुंबईतील वर्षा निवासस्थानी बैठक घेतली. भूसंपादनाअभावी एकही प्रकल्प रखडणार नाही याची संबंधित सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
प्रकल्प रखडल्यामुळे त्यांच्या खर्चात मोठ्या प्रमाणावर वाढ होते. त्यामुळे भूसंपादनाच्या प्रक्रियेसाठी सर्व यंत्रणांना 'टाइमलाईन' देण्यात आली असून, तिचे तंतोतंत पालन करावे, असे मुख्यमंत्री म्हणाले. सर्व यंत्रणा आणि संबंधित अधिकाऱ्यांनी 'मिशन मोड'वर गुणात्मक आणि रचनात्मक काम करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
मुख्यमंत्र्यांनी यावेळी काही विशिष्ट प्रकल्पांबद्दलही निर्देश दिले:
- वाढवण – इगतपुरी द्रुतगती महामार्गाचा समावेश सागरमाला योजनेत करण्याविषयीचा प्रस्ताव सादर करावा.
- जालना – नांदेड द्रुतगती महामार्गाचे परभणी जिल्ह्यातील सेलू येथील भूसंपादनाची प्रक्रिया १५ दिवसांत पूर्ण करावी.
- विदर्भातील भंडारा – गडचिरोली, नागपूर – चंद्रपूर, नागपूर - गोंदिया या सर्व द्रुतगती मार्गांचा आराखडा 'गतीशक्ती'वर रन करून अंतिम करून घ्यावा.
- वर्धा - गडचिरोली व वर्धा – नांदेड रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाची प्रक्रिया १५ दिवसांत पूर्ण करून काम मार्गी लावण्यात यावे.
राज्यातील महत्त्वाकांक्षी ११ प्रकल्पांच्या भूसंपादनासाठी लागणाऱ्या ५३ हजार ३५४ कोटी रुपयांच्या निधीची तरतूदही करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या आहेत.
----------------------------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra Projects, Land Acquisition, Chief Minister, Devendra Fadnavis, Infrastructure, Development
#MaharashtraDevelopment #LandAcquisition #CMDevendraFadnavis #InfrastructureProjects #ProjectManagement
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: