मुंबई: मुंबई विद्यापीठाने नुकत्याच जाहीर झालेल्या 'क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग २०२६' मध्ये ऐतिहासिक कामगिरी करत देशातील सर्वोत्तम उच्च शिक्षण संस्थांच्या यादीत १७ व्या स्थानावर झेप घेतली आहे. त्याचबरोबर, राज्यातील पारंपरिक विद्यापीठांच्या यादीत मुंबई विद्यापीठाने दुसरे स्थान पटकावले आहे. क्वाकरेली सायमंड (क्यूएस) यांनी जगासह देशातील सर्वोत्तम शिक्षण संस्था आणि विद्यापीठांची यादी जाहीर केली असून, यामध्ये मुंबई विद्यापीठाची कामगिरी अत्यंत प्रभावी ठरली आहे.
मागील काही वर्षांच्या तुलनेत विद्यापीठाने जागतिक क्रमवारीत मोठी सुधारणा केली आहे. यापूर्वी ७११-७२० च्या क्रमवारीच्या बँडमध्ये असलेल्या विद्यापीठाने यावर्षी ६६४ वे स्थान निश्चित करत उत्तुंग झेप घेतली आहे. क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगच्या अहवालानुसार, मुंबई विद्यापीठाने सर्वच क्षेत्रांत उत्तम कामगिरी केली आहे. विशेषतः एम्प्लॉयमेंट आउटकम (Employment Outcome) या वर्गवारीत सर्वाधिक ९५ गुण प्राप्त केले आहेत, जे विद्यापीठाच्या रोजगारक्षमतेचे द्योतक आहे.
इतर महत्त्वाच्या वर्गवारीतही विद्यापीठाने उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे:
- सायटेशन पर फॅकल्टी (Citation per Faculty) वर्गवारीत ५३.७ गुण.
- सस्टेनॅबिलिटी (Sustainability) वर्गवारीत ४१.३ गुण.
- एंप्लॉयर रेप्युटेशन (Employer Reputation) वर्गवारीत ३१.५ गुण.
- इंटरनॅशनल रिसर्च नेटवर्क (International Research Network) मध्ये २७.६ गुण.
- याशिवाय, एकेडमिक रेप्युटेशन, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी प्रमाण आणि फॅकल्टी-स्टुडंट्स रेशो यामध्येही विद्यापीठाने उत्तम कामगिरी केली आहे.
गेल्या काही वर्षांत मुंबई विद्यापीठाने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सामंजस्य करार केले आहेत, ज्यामुळे विविध व्यावसायिक आणि कौशल्याधारित अभ्यासक्रम सुरू करण्यास मदत झाली आहे. देशपातळीवर क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातही मुंबई विद्यापीठाची कामगिरी अतुलनीय आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील जर्नल्समध्ये विद्यापीठाच्या संशोधन पेपर्समध्ये १५६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. विद्यापीठाच्या १२ विभागांना अनेक राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमांमध्ये मान्यता मिळाली आहे. विद्यापीठाशी संलग्नित ८० हून अधिक प्राध्यापक विविध व्यावसायिक कार्यकारिणींवर कार्यरत आहेत, तर गेल्या पाच वर्षांत १८ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी येथील प्राध्यापकांना गौरविण्यात आल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------
Mumbai University, QS World Ranking, Education, Higher Education, Maharashtra
#MumbaiUniversity #QSRankings #HigherEducation #MaharashtraEducation #UniversityRanking
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: