पिंपरी: पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘निर्जली’ या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान मिळवला, तर तमिळ भाषेतील ‘थुनाई’ लघुपटाने सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार पटकावला. १ जून २०२५ रोजी या महोत्सवाचा पुरस्कार सोहळा उत्साहात पार पडला.
या महोत्सवात ४० देशांतील ९० हून अधिक चित्रपट, लघुपट, माहितीपट, अॅनिमेशन आणि ६० सेकंद फिल्म्स प्रदर्शित करण्यात आले. प्रियंका भेरिया यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा आणि तुषार शिंगाडे यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड फिल्म सोसायटी यांनी संयुक्तपणे या महोत्सवाचे आयोजन केले होते. आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या नेतृत्वात आकुर्डी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या सोहळ्यात देश-विदेशातील कलावंतांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले.
यावेळी राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य ॲड. गोरक्ष लोखंडे, महापालिका उपआयुक्त पंकज पाटील, विशेष अधिकारी किरण गायकवाड, लेखक दिग्दर्शक सुजय डहाके, अभिनेत्री राजश्री देशपांडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
ॲड. गोरक्ष लोखंडे म्हणाले की, “अशा महोत्सवांमुळे पिंपरी चिंचवडची सांस्कृतिक ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण होते. महापालिका यासाठी पुढाकार घेत आहे, हे कौतुकास्पद आहे.”
उपआयुक्त पाटील यांनी सांगितले की, “शहराच्या सांस्कृतिक विकासासाठी महापालिका नेहमी प्रयत्नशील राहील.”
किरण गायकवाड म्हणाले की, “पिंपरी चिंचवडला सांस्कृतिक शहर म्हणून ओळख मिळावी, यासाठी महापालिका प्रयत्न करत आहे.”
लेखक दिग्दर्शक सुजय डहाके यांनी या महोत्सवाला ‘कलाविश्वाची व्याप्ती वाढवणारा उपक्रम’ असे संबोधले. अभिनेत्री राजश्री देशपांडे यांनी कलाक्षेत्रातील संघर्षावर आपले विचार व्यक्त केले.
महोत्सवात विविध विभागांतर्गत विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. माहितीपट विभागात ‘दि लॉस्ट पॅराडाईज’ आणि ६० सेकंद चित्रपट विभागात ‘पालवी’ सर्वोत्कृष्ट ठरले. दिग्दर्शक अविनाश कांबीकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विक्रम शेळके, पौर्णिमा भोर, पलक कौल आणि श्रुती रनवरे यांनी केले. आभार डॉ. विश्वास शेंबेकर यांनी मानले. मुंबा फिल्म फाउंडेशन आणि महात्मा फुले महाविद्यालय, पिंपरी यांनी या महोत्सवासाठी विशेष सहकार्य केले.
----------------------------------------------------------------------------------------------------------- #PCMCFilmFestival #FilmFestival #MarathiCinema #IndianCinema #WorldCinema #PimpriChinchwad #Maharashtra #CulturalEvent
Reviewed by ANN news network
on
६/०१/२०२५ ०४:२०:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: