पिंपरी, पुणे (दि. २९ जून २०२५): पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने नुकताच जाहीर केलेल्या प्रारूप विकास आराखड्यात प्रभाग क्रमांक १९ मधील आरक्षण क्रमांक २६०, २६२ आणि २६४ येथे दफनभूमीचे आरक्षण सुचवले आहे. हे आरक्षण शाळा आणि रहिवासी परिसरालगत असल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास होऊ शकतो, असे मत आमदार उमाताई खापरे यांनी व्यक्त केले आहे. तसेच, लिंक रोड, भाटनगर येथील दफनभूमीपेक्षा चौपट मोठ्या आकाराची जागा यासाठी आरक्षित करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी केला.
नागरिकांचा तीव्र विरोध
या आरक्षणामुळे चिंचवड, तानाजी नगर आणि लिंक रोड परिसरातील सर्व सोसायट्यांनी तीव्र हरकत घेतली आहे. शुक्रवारी ऑटो क्लस्टर येथे झालेल्या बैठकीत आमदार उमा खापरे यांच्यासोबत २५० पेक्षा जास्त नागरिकांनी लेखी स्वरूपात हरकती दाखल केल्या. यावेळी चिंचवड, प्राधिकरण भाजपा मंडळ अध्यक्ष जयदीप गिरीश खापरे, साई उद्यान सोसायटी, लाईफस्टाईल सोसायटी, संत गार्डन गृहनिर्माण सहकारी संस्था, भक्ती पॅराडाईज सोसायटी, यशोपुरम सोसायटी, देवी लिंक सोसायटी आदी सोसायटींमधील प्रतिनिधी तसेच परिसरातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
आरोग्य आणि पर्यावरणाच्या समस्यांचा धोका
यावेळी चिंचवड, प्राधिकरण भाजपा मंडळ अध्यक्ष जयदीप खापरे यांनी सांगितले की, हे दफनभूमीचे आरक्षण शहराच्या अगदी मध्यवर्ती भागात आणि पवित्र पवना नदीच्या तीरावर आहे. यामुळे नदी प्रदूषण होऊन, आजूबाजूच्या परिसरातील नागरिक, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. तसेच, या नियोजित आरक्षणात गरजेपेक्षा खूपच जास्त जागा दर्शवण्यात आली आहे.
आरक्षण रद्द करण्याची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा
जयदीप गिरीश खापरे यांनी आयुक्त शेखर सिंह यांना विनंती केली आहे की, हे दफनभूमीचे आरक्षण रद्द करून ही जागा इतर सार्वजनिक सेवा आणि सुविधांसाठी वापरली जावी, जेणेकरून येथील नागरिकांना दिलासा मिळेल. अन्यथा, चिंचवड प्राधिकरण भाजप मंडळ तसेच लिंक रोड, चिंचवड परिसरातील नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
Pimpri-Chinchwad, Draft Development Plan, Burial Ground Reservation, Residential Area, MLA Umatai Khapre, Jaydeep Girish Khapre, Citizen Protest, Public Health, Environmental Concern, Pawana River, Link Road, Chinchwad, Municipal Corporation, Urban Planning
#PimpriChinchwad #BurialGround #DevelopmentPlan #CitizenProtest #UmataiKhapre #JaydeepKhapre #PublicHealth #EnvironmentalProtection #UrbanPlanning #Maharashtra

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: