भरत जाधव यांनी पिंपरी चिंचवडमधील सफाई कर्मचाऱ्यांशी साधला संवाद

 


महापालिकेच्या वतीने सफाई कर्मचाऱ्यांसाठी 'आता थांबायचं नाय' चित्रपटाचे विशेष स्क्रीनिंग

पिंपरी, दि. २: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सफाई कर्मचाऱ्यांसाठी 'आता थांबायचं नाय' या प्रेरणादायी चित्रपटाच्या विशेष स्क्रीनिंगचे आयोजन केले. या उपक्रमाचे सुप्रसिद्ध मराठी अभिनेते भरत जाधव यांनी कौतुक केले. ते म्हणाले, "महापालिकेने सफाई कर्मचाऱ्यांसाठी या चित्रपटाचे आयोजन करून त्यांना प्रेरणा देण्याचे आणि त्यांच्यामध्ये शिक्षणाचे महत्त्व रुजविण्याचे प्रशंसनीय कार्य केले आहे. शिक्षणासाठी धडपडणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आवाज या चित्रपटातून जनसामान्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल."

पिंपरी चिंचवड महानगरपालिका आपल्या कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता आणि मानसिक आरोग्य वाढवण्यासाठी नियमितपणे विविध उपक्रम राबवते. याच अंतर्गत आरोग्य विभागातर्फे 'स्वच्छ भारत अभियान' अंतर्गत सफाई सेवकांसाठी 'आता थांबायचं नाय' या मराठी चित्रपटाचे खास स्क्रीनिंग आज पिंपरीतील विशाल सिनेमा येथे आयोजित करण्यात आले होते.

या विशेष कार्यक्रमाला उपायुक्त अण्णा बोदडे, सचिन पवार, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, मुख्य आरोग्य निरीक्षक श्रीराम गायकवाड, विशाल थिएटरचे संचालक वसंत पिंपळे, विशाल पिंपळे, युवराज पिंपळे आणि आरोग्य विभागाचे अनेक कर्मचारी उपस्थित होते.

अभिनेते भरत जाधव पुढे म्हणाले, "शहर स्वच्छता ही एक सामाजिक जबाबदारी आहे आणि आपले सफाई सेवक पहाटेपासून शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी निभावतात. खरे स्वच्छतादूत तेच आहेत, मी तर केवळ चित्रपटात भूमिका साकारली. 'आता थांबायचं नाय' हा केवळ चित्रपट नाही, तर एका सामान्य माणसाच्या असामान्य जिद्दीची कहाणी आहे. शिक्षण ही प्रत्येकाची मूलभूत गरज आहे, मग तो अधिकारी असो वा सफाई कामगार, हा संदेश या चित्रपटातून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शिक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या या कर्मचाऱ्यांची कथा माझ्या हृदयाला स्पर्श करून गेली. त्यांच्या जिद्दीला सलाम! अशी प्रेरणादायी सत्यकथा सर्वांसमोर मांडणे हे एक कलाकार म्हणून माझे कर्तव्य आहे असे मला वाटले आणि म्हणूनच हा चित्रपट सध्या संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेने पुढाकार घेऊन सफाई कर्मचाऱ्यांसाठी हा चित्रपट दाखवला, ही खरोखरच कौतुकास्पद बाब आहे."

उपायुक्त सचिन पवार म्हणाले, "'आता थांबायचं नाय' हा चित्रपट सफाई सेवकांच्या दैनंदिन जीवनातील संघर्ष, अडचणी आणि अनुभवांवर आधारित आहे. या चित्रपटातून त्यांचे कार्य प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही कलाकृती सफाई कामगारांच्या अथक मेहनतीची आणि महत्त्वपूर्ण योगदानाची दखल घेते. या स्क्रीनिंगमागे त्यांच्या कामाबद्दल समाजामध्ये आदर आणि जागरूकता निर्माण करणे हा उद्देश आहे. आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या निर्देशानुसार पिंपरी चिंचवडमध्ये अशा प्रकारचा उपक्रम पहिल्यांदाच राबविण्यात आला आहे. सफाई सेवकांमध्ये नवचैतन्य निर्माण करणे, कामाबद्दल जागरूकता वाढवणे आणि त्यांच्या कार्याला प्रेरणा देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमामुळे सफाई सेवकांनाही त्यांच्या कार्याचा अभिमान वाटेल आणि ते अधिक उत्साहाने काम करतील."

दरम्यान, अभिनेते भरत जाधव यांच्या उपस्थितीत सर्व उपस्थितांनी स्वच्छतेची शपथ घेतली. चित्रपट पाहिल्यानंतर अनेक सफाई कर्मचाऱ्यांनी हा चित्रपट हृदयस्पर्शी असल्याचे मत व्यक्त केले आणि अभिनेते भरत जाधव यांचे अभिनंदन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन पवार यांनी केले, सूत्रसंचालन आणि स्वच्छता शपथेचे वाचन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले, तर अण्णा बोदडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

---------------------------------------------------------------------------------------------------------

#PimpriChinchwad #BharatJadhav #SanitationWorkers #AataThambaychaNay #FilmScreening #SocialInclusion #PMC #SwachhBharatAbhiyan

भरत जाधव यांनी पिंपरी चिंचवडमधील सफाई कर्मचाऱ्यांशी साधला संवाद भरत जाधव यांनी पिंपरी चिंचवडमधील सफाई कर्मचाऱ्यांशी साधला संवाद Reviewed by ANN news network on ६/०२/२०२५ ०६:२८:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".