पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू सहकारी आणि माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे पुत्र सत्यजितसिंह पाटणकर, तसेच खानापूर-आटपाडी मतदारसंघाचे माजी आमदार सदाशिवराव पाटील यांचे पुत्र आणि विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी मंगळवारी (आज) पदाधिकाऱ्यांसह भारतीय जनता पार्टीमध्ये (भाजप) प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे सातारा आणि सांगली जिल्ह्यांमध्ये भाजपला मोठे बळ मिळाल्याचे बोलले जात आहे.
रविंद्र चव्हाण आणि चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात भाजप प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सत्यजितसिंह पाटणकर आणि वैभव पाटील यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी खासदार उदयनराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, सातारा जिल्हाध्यक्ष आमदार अतुलबाबा भोसले, सांगली जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, आमदार सत्यजित देशमुख, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, प्रदेश मुख्यालय प्रभारी रवींद्र अनासपुरे आणि प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी मान्यवर उपस्थित होते.
सातारा आणि सांगलीत भाजपला बळकटी मिळेल - रविंद्र चव्हाण
यावेळी बोलताना कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले की, २०१९ आणि २०२४ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार राहिलेल्या सत्यजितसिंह पाटणकर आणि वैभव पाटील यांच्या पक्षप्रवेशामुळे सातारा आणि सांगली जिल्ह्यात पक्षाला बळकटी मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 'विकसित भारत' आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे 'विकसित महाराष्ट्राचे' स्वप्न पूर्ण करण्यासाठी श्री. पाटणकर आणि श्री. पाटील यांनी भाजपला साथ दिली आहे. पक्षात प्रवेश केलेल्या सर्वांचा यथोचित मान राखला जाईल, अशी ग्वाहीही चव्हाण यांनी दिली.
पाटणकर यांच्यासोबत अनेक स्थानिक नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर यांच्यासोबत हिंदूराव पाटील, याज्ञसेन पाटणकर, राजाभाऊ शेलार, राजेश पवार आदींनी भाजपामध्ये प्रवेश केला. महत्त्वाचे म्हणजे, पाटण तालुका दूधसंघ, अर्बन बँक आणि खरेदी-विक्री संघाचे चेअरमन तसेच सर्व संचालकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. याशिवाय, पाटण नगरपंचायतीचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांसह सर्व आजी-माजी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सभापती व सदस्यांचाही भाजपामध्ये समावेश झाला आहे. यामुळे पाटण तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
Political News, BJP, Maharashtra Politics, Sharad Pawar, Satyajit Singh Patankar, Vaibhav Patil, Ravindra Chavan, Chandrakant Patil, Satara, Sangli, Political Entry- #MaharashtraPolitics #BJP #PoliticalDefection #SharadPawar #Satara #Sangli #PoliticalNews #MarathiNews #SatyajitPatankar #VaibhavPatil #Maharashtra
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: