ए एन एन न्यूज नेटवर्क: प्रादेशिक बातम्या
दिनांक: ९ जून २०२५
नमस्कार,
ए एन एन न्यूज नेटवर्कमध्ये आपले स्वागत
आजच्या ठळक बातम्या:
पुण्यात १४ दिवसांचा मनाई आदेश
नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा
पावसाळी बंदीतही मासेमारी, ५ नौकांवर कारवाई
स्टारलिंकच्या भारतातील प्रवेशाला माकपचा विरोध
श्याम म्हात्रे पुण्यस्मरणार्थ आरोग्य शिबिरे
पुण्यात 'गांधी दर्शन' शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
पुण्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी येत्या १० जूनपासून पुढील १४ दिवसांसाठी मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. दगड, शस्त्रे किंवा कोणतीही ज्वलनशील वस्तू बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. जमावबंदी तसेच कोणत्याही पुतळ्याचे किंवा प्रतिमेचे प्रदर्शन करण्यासही बंदी घालण्यात आली आहे.
नगपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा नव्याने स्थापन झालेल्या नगरपंचायतींमध्ये समावेश करण्याबाबतचा प्रस्ताव आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या पदनिर्मितीचा प्रस्ताव आठवडाभरात राज्य सरकारकडे सादर केला जाईल. स्वच्छता निरीक्षकांच्या पदनिर्मितीचा अभ्यास अंतिम टप्प्यात आहे.
उरण, रायगड आणि मुंबईच्या समुद्रात पावसाळी मासेमारी बंदी काळातही बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्या ५ नौकांवर मत्स्य विभागाने कारवाई केली आहे. या नौकांमध्ये जय गौरी नंदन, एकवीरा माता, श्री जागृत गौराई, भवानी जगदंबा आणि देवाची आळंदी या नौकांचा समावेश आहे. एका नौकेकडून १ लाख ३० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
एलॉन मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीला भारतात काम करण्याची परवानगी देण्यास भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) ने तीव्र विरोध दर्शवला आहे. यामुळे देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, असे माकपचे म्हणणे आहे.
ज्येष्ठ कामगार नेते श्याम म्हात्रे यांच्या सातव्या पुण्यस्मरणानिमित्त पनवेल येथे महिलांसाठी मोफत आरोग्य आणि नेत्र तपासणी शिबिरे आयोजित करण्यात आली होती. श्याम म्हात्रे यांच्या कन्या आणि कामगार नेत्या श्रुती श्याम म्हात्रे यांनी या शिबिराचे आयोजन केले होते.
पुण्यातील कोथरूड येथील गांधी भवन येथे महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलातर्फे आयोजित 'गांधी दर्शन' शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लोकशाही, माध्यमे आणि श्रद्धा या विषयांवर या शिबिरात विचारमंथन झाले. ज्येष्ठ विधिज्ञ उल्हास बापट, पत्रकार प्रशांत कदम आणि दिग्दर्शक मंजुल भारद्वाज यांनी मार्गदर्शन केले.
या होत्या आजच्या प्रादेशिक बातम्या. अधिक बातम्यांसाठी ऐकत रहा ए एन एन न्यूज नेटवर्क. नमस्कार.
----------------------------------------------------------------------------------------#MarathiNews #PuneUpdates #Akashvani #NewsBulletin #ProhibitoryOrders #Nagarpanchayat #FishingBan #Starlink #HealthCamp #GandhiDarshan
Reviewed by ANN news network
on
६/०९/२०२५ ०७:३५:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: