डिजिटल अटकेच्या नावे डॉक्टर महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; आंतरराष्ट्रीय टोळी गजाआड

 


नवी मुंबई: नवी मुंबई पोलिसांनी एका मोठ्या कारवाईत डिजिटल अटकेची भीती दाखवून एका डॉक्टर महिलेची तब्बल १ कोटी ८१ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. या टोळीतील तीन सदस्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ११ लाख ३५ हजार रुपयांची रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेले साहित्य जप्त करण्यात आले आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त अजयकुमार लांडगे यांनी बेलापूर येथील पोलीस आयुक्तालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या टोळीने आयकर विभागाचे अधिकारी असल्याची खोटी ओळख सांगून सीबीआय, ईडी आणि सर्वोच्च न्यायालयाच्या बनावट लेटरहेडचा वापर केला. हे बनावट लेटरहेड त्यांनी ऑनलाइन पद्धतीने महिलेला पाठवून भीती निर्माण केली.

व्यवसायाने डॉक्टर असलेल्या या महिलेला १४ जानेवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान व्हॉट्सॲपवरून संपर्क साधण्यात आला होता. आरोपींनी महिलेला तिने करचोरी केली असून तिच्या नावे दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल असल्याची खोटी माहिती दिली. यानंतर, अमित चौधरी केसमध्ये त्यांचे क्रेडिट कार्ड सापडले आहे, असे सांगून तिला डिजिटल अटक करण्यात आल्याची भीती दाखवली. यातून सुटका मिळवण्यासाठी आणि संपत्तीची पडताळणी करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) मार्फत प्रक्रिया करायची आहे, असे सांगून आरोपींनी महिलेकडून तिच्या बँक खात्यातील आणि शेअर मार्केटमधील गुंतवणुकीची माहिती मागवली.

आरोपींच्या सांगण्यानुसार, महिलेने त्यांच्या विविध सहा बँक खात्यांमध्ये एकूण १ कोटी ८१ लाख ७२ हजार रुपये जमा केले. आरोपींकडून सातत्याने पैशांची मागणी होत असल्याने महिलेला संशय आला आणि तिने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी १७ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आणि आता या टोळीतील तीन सदस्यांना अटक करण्यात यश मिळवले आहे.

सहाय्यक पोलीस आयुक्त लांडगे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कायद्यात डिजिटल अटकेची कोणतीही संकल्पना नाही. त्यामुळे कोणताही शासकीय अधिकारी फोनवरून कारवाईची धमकी देत असेल किंवा डिजिटल अटकेचा उल्लेख करत असेल, तर तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. तसेच, कोणत्याही खात्यात पैसे हस्तांतरित करण्यापूर्वी खात्री करावी.

--------------------------------------------------------------------------------------------------------

#CyberFraud #DigitalArrestScam #NaviMumbaiPolice #OnlineFraud #FinancialCrime #Arrested #CyberCrimeAwareness #MaharashtraCyber

डिजिटल अटकेच्या नावे डॉक्टर महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; आंतरराष्ट्रीय टोळी गजाआड डिजिटल अटकेच्या नावे डॉक्टर महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; आंतरराष्ट्रीय टोळी गजाआड Reviewed by ANN news network on ५/३१/२०२५ ०४:३५:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".