जप्त गाडी सोडवण्यासाठी लाच मागितली, दौंडमधील पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

 


पुणे, दि. २९ मे २०२५: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (अॅन्टी करप्शन ब्युरो) आज दौंड पोलीस स्टेशनमधील एका पोलीस अंमलदारावर लाच मागणी केल्याप्रकरणी कारवाई केली आहे. पोलीस शिपाई रमेश शिवाजी करचे (वय ३६, ब.नं. २७०५) यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ चे कलम ७ आणि ७ अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांच्या मालकीची एक महिंद्रा जीप (क्रमांक MH ४२ / AS ६६५८) दौंड पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गु.र.नं. ८८२/२०२५ या गुन्ह्यात जप्त करण्यात आली होती. ही जप्त केलेली गाडी परत मिळवण्यासाठी तक्रारदाराने न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर तपासी अधिकाऱ्यांचे म्हणणे न्यायालयात सादर करायचे होते. याच कामासाठी गुन्ह्याचे तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. पाटील आणि लेखनिक पोलीस शिपाई रमेश करचे यांनी तक्रारदाराकडे सुरुवातीला १०,००० रुपयांची लाच मागितली. त्यानंतर तडजोडअंती ५,००० रुपये देण्याचे ठरले, अशी तक्रार तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे येथे दि. ७ एप्रिल २०२५ रोजी दाखल केली होती.

या तक्रारीची दखल घेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली. पडताळणीमध्ये पोलीस शिपाई रमेश करचे यांनी तक्रारदाराकडे त्यांच्या जप्त गाडीच्या न्यायालयीन प्रक्रियेत मदत करण्यासाठी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार, आज दिनांक २९ मे २०२५ रोजी दौंड पोलीस स्टेशनमध्ये रमेश शिवाजी करचे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक श्री. शिरीष सरदेशपांडे, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे, ला.प्र.वि. पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री. विजय पवार, ला.प्र.वि., पुणे हे करत आहेत.

पोलीस अधीक्षक श्री. शिरीष सरदेशपांडे यांनी जनतेला आवाहन केले आहे की, कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाचेची मागणी करत असल्यास, त्यांनी तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे कार्यालयाशी संपर्क साधावा. संपर्क साधण्यासाठी दूरध्वनी क्रमांक ०२० २६१२२१३४, २६१३२८०२, २६०५०४२३ तसेच व्हॉट्स अॅप क्रमांक मुंबई - ९९३०९९७७०० आणि ई-मेल आयडी dyspacbpune@mahapolice.gov.in यावर संपर्क साधता येईल. अधिक माहितीसाठी www.acbmaharashtra.gov.in या वेबसाईटला भेट द्या किंवा ऑनलाईन तक्रार www.acbmaharashtra.net.in या अॅपवर नोंदवा, असे आवाहन करण्यात आले आहे.

---------------------------------------------------------------------------------------------------------

#Pune #Maharashtra #Corruption #ACB #Police #Daund #CrimeNews #AntiCorruptionBureau #Bribe

जप्त गाडी सोडवण्यासाठी लाच मागितली, दौंडमधील पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात जप्त गाडी सोडवण्यासाठी लाच मागितली, दौंडमधील पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात Reviewed by ANN news network on ५/३१/२०२५ ०४:३०:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".