प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल करण्याचा वस्तुपाठ
व्याख्यानमालेसाठी बांधकाम व्यावसायिक सागर धुमाळ अध्यक्षस्थानी होते. तसेच उद्योजक भगवान पठारे, माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे, नरेंद्र बनसोडे, आदित्य हजारे, राजू दुर्गे, आयुष निंबारकर, भावेश भोजने आणि मुख्य संयोजक मारुती भापकर यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
आपल्या भाषणात प्रा. बानगुडे-पाटील यांनी शंभुराजेंच्या जीवनातील अनेक पैलूंवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, "प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल कसे करावे याचा वस्तुपाठ शंभुराजे यांनी घालून दिला. १४ मे १६५७ रोजी जन्मलेल्या या बाळाचे 'संभाजीराजे' असे नामकरण जिजाऊ माँसाहेब यांनी केले होते. दोन वर्षांचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले."
बहुआयामी व्यक्तिमत्त्व
छत्रपती संभाजी महाराजांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकताना प्रा. बानगुडे-पाटील म्हणाले, "धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, नीतीशास्त्र, राज्यशास्त्र यांमध्ये निपुण होत त्यांनी इंग्रजीसह सोळा भाषांवर प्रभुत्व मिळवले. काव्यरचना आणि संस्कृत भाषेतील 'बुधभूषण' आदी ग्रंथांचे लेखन करताना मल्लखांब, घोडेस्वारी यांमध्येही त्यांनी प्रावीण्य मिळवले होते."
आपल्या भाषणात त्यांनी आग्रा येथून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुटकेचा आणि त्यानिमित्ताने शंभुराजे यांचे निधन झाल्याची खोटी वार्ता प्रसृत केल्याचा प्रसंगही उपस्थितांच्या निदर्शनास आणून दिला. ते म्हणाले, "आग्रा येथून सुटका करून घेताना शत्रूची दिशाभूल करण्यासाठी शिवाजीमहाराज यांनी शुंभराजे यांचे निधन झाल्याची खोटी वार्ता प्रसृत केली; पण त्यानंतर मृत्यू सतत त्यांचा पाठलाग करीत राहिला."
कर्तबगार छत्रपती
छत्रपती म्हणून शंभुराजे यांनी केलेल्या कामगिरीचे वर्णन करताना प्रा. बानगुडे-पाटील म्हणाले, "शिवाजीमहाराज यांनी सोपवलेली प्रत्येक जबाबदारी शंभुराजे यांनी चोखपणे पार पाडली. शिवाजीमहाराज यांचे निधन झाल्यानंतर शंभुराजे यांच्या विरोधात कारस्थान रचण्यात आले; परंतु हंबीरराव यांनी ते हाणून पाडले. त्यांच्यावर तीन वेळा विषप्रयोग करण्यात आला."
त्यांनी पुढे सांगितले, "छत्रपती झाल्यानंतर शंभुराजे यांनी बुऱ्हाणपूर लुटल्यावर औरंगजेब चवताळून उठला. आपल्या अफाट सैन्यासह स्वराज्यावर चालून आला. शंभुराजे यांना पराभूत केल्याशिवाय डोक्यावर बादशाही पगडी घालणार नाही, अशी त्याने प्रतिज्ञा केली; पण शेवटपर्यंत पगडी घालण्याची संधी त्याला मिळाली नाही."
अपराजित योद्धा
छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर भर देताना प्रा. बानगुडे-पाटील यांनी त्यांच्या शेवटच्या क्षणांचेही वर्णन केले, "दुर्दैवाने परिस्थितीने शंभुराजे यांना साथ दिली नाही; आणि त्यांना कैद झाली. अनन्वित अत्याचार आणि अवहेलना सोसून त्यांनी बलिदान दिले; परंतु एकाही लढाईत पराभूत न होणारा राजा अशी इतिहासाला त्यांची दखल घ्यावी लागली."
त्यांनी संभाजी महाराजांविषयी चुकीच्या इतिहासलेखनाबद्दल खेदही व्यक्त केला, "नाट्य-चित्रपटसृष्टीतून त्यांचा बदनामीकारक इतिहास रंगवला गेला; पण शिवाजीमहाराज यांच्या चारित्र्याइतकेच शंभुराजे यांचे चारित्र्य स्वच्छ होते!"
अतिशय ओघवत्या अन् अभिनिवेशपूर्ण वक्तृत्वशैलीतून बानगुडे-पाटील यांनी संभाजीमहाराज यांचा ज्वलंत जीवनपट मांडून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी विविध मान्यवरांचे योगदान
कार्यक्रमाच्या संयोजनात प्रकाश हगवणे, राम नलावडे, शरद थोरात, विक्रम पवार आणि जितेंद्र छाबडा यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र घावटे यांनी केले, तर मारुती भापकर यांनी आभार मानले.
------------------
#ChhatrapatiSambhajiMaharaj
#NitinBangudePatil
#MarathaHistory
#Pimpri
#ShivLecture
#HistoricalTalk
#MarathiCulture
#SambhajiRaje
#HistoricalNarrative
#SpeakerSeries
Reviewed by ANN news network
on
५/१०/२०२५ ०६:१३:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: