परिसरात गॅस गळतीमुळे नागरिकांमध्ये भीती
उरण, दि. १९ मे: उरण तालुक्यातील करळ/सोनारी पुलावरील अवघड वळणावर आज दुपारी तीन ते चार वाजेच्या दरम्यान गॅस टँकर पलटी झाल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र लाखो रुपयांची गॅस गळती होऊन गॅसचा वास आणि धूर सुमारे २ ते ३ किलोमीटर परिसरातील गावांमध्ये पसरला.
अपघातानंतर प्रशासनाने तात्काळ कारवाई करत रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केला. उरण पोलीस स्टेशन, न्हावा शेवा पोलीस स्टेशन आणि वाहतूक पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. बिपीसीएल रेस्क्यू टीम, सिडको अग्निशमन दल आणि जेएनपीटी अग्निशमन दल यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
वाहतूक विभागाचे डीसीपी तिरुपती काकडे, एसीपी विठ्ठल कुबडे, पोलीस निरीक्षक अतुल दहिफळे, न्हावाशेवा ट्रॅफिक पोलीस निरीक्षक मुजावर आणि गव्हाण फाटा ट्रॅफिक पोलीस निरीक्षक बदगुजर यांनी अपघातस्थळी पाहणी केली.
प्राथमिक तपासानुसार, वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला असल्याचे समजते. वाहतूक पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. स्थानिक नागरिकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने परिसरात फिरू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
गॅस टँकर अपघातामुळे परिसरातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली असून, परिसरातील रहिवाशांना गॅस गळतीचा त्रास होत असल्याने प्रशासनाने तात्काळ उपाययोजना केल्या आहेत. अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने स्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू केले आहेत.
-------------------------------------------
#UranAccident #GasTankerOverturned #TrafficAlert #EmergencyResponse #GasLeak #RoadSafety #MaharashtraNews #DisasterManagement #IndustrialSafety
Reviewed by ANN news network
on
५/१९/२०२५ ०८:३९:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: