मुंबई, २१ मे २०२५: महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा तडाखा सुरूच असून पुण्यात काल झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे होर्डिंग्ज कोसळली, रस्ते जलमय झाले आणि वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली. भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील पाच दिवसांसाठी राज्यात पावसाचा इशारा देत नागरिकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे.
समाज माध्यमांवर प्रसारित होत असलेल्या व्हिडीओंमधून शेतकऱ्यांची पिके मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त झाल्याचे चित्र समोर येत आहे. अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्गावर आर्थिक संकट कोसळले आहे.
"आज महाराष्ट्रात सर्वत्र पावसासह वादळी वाऱ्याची शक्यता असून, विदर्भात यलो अलर्ट दिला गेला आहे. पश्चिम महाराष्ट्र, नाशिकसह उत्तर महाराष्ट्र आणि रायगड ते सिंधुदुर्गपर्यंतच्या कोकण पट्ट्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे," असे हवामान विभागाचे अधिकारी म्हणाले.
विदर्भातील नागरिकांना २४ तासांनंतर दिलासा मिळण्याची शक्यता आहे. "२२ मे रोजी विदर्भातील काही भागातून यलो अलर्ट हटवून ग्रीन अलर्ट देण्यात येईल. मात्र, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील पावसाची तीव्रता कायम राहील," असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
२३ मे रोजी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता असली तरी, ठाणे, पुणे जिल्ह्यातील घाट परिसर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट कायम राहणार आहे. "या भागांत वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे," असे हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक, अहमदनगर, पुणे, बीड आणि विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान विभागाने नागरिकांना सल्ला दिला आहे की, "विजेच्या कडकडाटासह पावसाच्या काळात घराबाहेर पडणे टाळावे. अत्यावश्यक असल्याशिवाय प्रवास करू नये आणि मोकळ्या जागेत आश्रय घेऊ नये."
जिल्हा प्रशासनाला आपत्कालीन प्रतिसाद पथके सज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पावसामुळे कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्वरित कारवाईसाठी सज्जता राखण्यास सांगण्यात आले आहे.
-------------------------------------------------
#MaharashtraRains #WeatherAlert #OrangeAlert #PuneRains #CropDamage #MumbaiRains #IMDForecast #KonkanAlert #UnseasoanlRain #ClimateEmergency

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: