मच्छीमार बांधवांना शेतकऱ्यांप्रमाणेच सवलती मिळणार - मंत्री नितेश राणे

 



उरण, दि. २४: "शेतकऱ्यांना ज्या सवलती मिळतात, त्याच मच्छीमार बांधवांनाही मिळतील. मच्छीव्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा मिळाल्यामुळे हे शक्य झाले आहे. या सवलतींची १०० टक्के पूर्तता करण्यासाठी मी आणि माझे खाते प्रयत्नशील राहू," अशी ग्वाही मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली. करंजा येथे झालेल्या जाहीर सत्कार समारंभात ते बोलत होते.

मच्छीव्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा मिळाल्याबद्दल नितेश राणे यांचा करंजा येथे सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते रवी भोईर, कौशिक शाह, तालुकाध्यक्ष धनेश गावंड, शहराध्यक्ष प्रसाद भोईर यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मच्छीमार बांधव उपस्थित होते.

नितेश राणे म्हणाले, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने पहिल्या १०० दिवसांत मच्छीव्यवसायाला कृषी दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. यामुळे मच्छीमारांच्या जीवनात बदल घडणार आहे. त्यांना वीज दरात सवलत, किसान क्रेडिट कार्डचा लाभ, मासेमारी साहित्य सवलतीच्या दरात आणि नैसर्गिक आपत्ती आल्यास मदत मिळेल."

ते पुढे म्हणाले, "करंजा हे देशातील एक नंबरचे बंदर ठरेल आणि महाराष्ट्राच्या विकासात भर टाकेल. आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी हे समाजातील सर्व घटकांच्या हितासाठी झटत असतात."

आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल आणि उरण तालुक्यात होत असलेल्या विकासकामांची माहिती दिली. आमदार महेश बालदी यांनी करंजा बंदराचे उर्वरित काम पूर्ण करण्याची, मोरा, नवापाडा येथील मच्छीमारांना मोबदला देण्याची, रेवस-करंजा ब्रिजमधील बाधितांना नुकसानभरपाई देण्याची आणि मच्छीमारांना डिझेल परतावा देण्याची मागणी केली.

या कार्यक्रमात भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनीही विचार मांडले. करंजा मच्छीमार सोसायटीचे चेअरमन प्रदीप नाखवा यांनी प्रास्ताविक केले. उरणमधील विविध सामाजिक संस्था संघटनांनी नितेश राणे यांना निवेदन दिले. नितेश राणे यांनी समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले.

-------------------------------------------------------------------------------------------------------------

#Uran #NiteshRane #Fishermen #AgricultureStatus #Maharashtra #Karinja

मच्छीमार बांधवांना शेतकऱ्यांप्रमाणेच सवलती मिळणार - मंत्री नितेश राणे मच्छीमार बांधवांना शेतकऱ्यांप्रमाणेच सवलती मिळणार - मंत्री नितेश राणे Reviewed by ANN news network on ५/२५/२०२५ ०२:१५:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".