रत्नागिरी: स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र उपक्रमांतर्गत नूतनीकरण केलेल्या खानू प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण आज राज्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न झाले. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) निधीतून आणि विश्वनाथ कॅन्सर केअर फाऊंडेशनच्या सहकार्याने २ कोटी ३० लाख रुपये खर्चून या आरोग्य केंद्राचे आधुनिकीकरण करण्यात आले आहे.
पालकमंत्री डॉ. सामंत यांनी कोनशिला अनावरण करून आणि फीत कापून या केंद्राचे लोकार्पण केले. याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, एसबीआयचे डीजीएम चंद्रशेखर बोहरा, मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र, अरुण जैन, बाबू म्हाप यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले की, सुसज्ज सामग्री आणि मॉड्युलर ऑपरेशन थिएटर असलेले हे राज्यातील पहिले प्राथमिक आरोग्य केंद्र खानू येथे साकारले आहे. या देखण्या इमारतीची देखभाल करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. गावातील चांगल्या दर्जाचे प्राथमिक आरोग्य केंद्र वर्षानुवर्षे टिकवणे आवश्यक आहे. त्यांनी बाजूच्या ग्रामपंचायत इमारतीच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर करण्याचे आश्वासन दिले आणि सरपंच व सदस्यांनी चांगल्या दर्जाची इमारत तयार करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
पालकमंत्री डॉ. सामंत यांनी माजी सैनिक अरुण आठल्ये यांचा विनामूल्य जागा दिल्याबद्दल सत्कार केला. अरुण आठल्ये यांनी सैन्यात असताना देशासाठी केलेल्या कार्याचा त्यांनी गौरव केला. अधिकाऱ्यांनी चांगले काम करण्याचा संकल्प कायम ठेवावा आणि ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ व अधिकाऱ्यांनी मिळून इमारतीची चांगली देखभाल करावी, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला आणि धन्वंतरी पूजन झाले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आठल्ये यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. या लोकार्पण सोहळ्याला आशा सेविका, अंगणवाडी सेविका आणि परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-----------------------------------------------------------------------------------------------
#KhanuPHC #HealthCenter #Renovation #UdaySamant #SBICSR #Healthcare #Ratnagiri #Maharashtra

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा