सोमवार, १९ मे, २०२५

शहीदांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही; ‘तिरंगा यात्रे’तून पुणेकरांचा निर्धार

 



पावसाला न जुमानता पुणेकरांचा एल्गार; दहशतवादाविरोधात ‘तिरंगा’ घेऊन रस्त्यावर

पुणे: जम्मू-काश्मीरमधील पहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि भारतीय लष्कराच्या शौर्याला सलाम करण्यासाठी आज, रविवार १८ मे रोजी पुण्यात एका भव्य ‘तिरंगा यात्रे’चे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज स्मारकापासून सुरू झालेली ही यात्रा ज्ञानेश्वर पादुका चौकात समारोप सभेत रूपांतरित झाली.

मुसळधार पावसाच्या सरी कोसळत असतानाही पुणेकरांचा उत्साह ओसरला नाही. हातात तिरंगा ध्वज घेऊन आणि ‘वंदे मातरम्’, ‘भारत माता की जय’, ‘दहशतवाद मुर्दाबाद’ अशा गगनभेदी घोषणा देत नागरिकांनी शहरातील रस्ते दुमदुमून टाकले. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसह सर्व वयोगटातील नागरिकांनी या यात्रेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

यावेळी बोलताना केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले, “आता दहशतवाद कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. शहीदांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही. भारताची भूमी आणि अस्मिता सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिक कटिबद्ध आहे. ज्या धैर्याने भारताने पाकिस्तानला प्रत्युत्तर दिले, त्याच प्रकारे यापुढेही दहशतवादाचे समूळ उच्चाटन केले जाईल.”

भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी सांगितले की, “ही तिरंगा यात्रा केवळ दहशतवादाचा निषेध नाही, तर देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूर जवानांना आणि निष्पाप नागरिकांना आदरांजली अर्पण करण्याची सामूहिक भावना आहे. एक समाज म्हणून एकत्र येऊन आपले कर्तव्य बजावण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.”

या यात्रेत सहभागी झालेल्या गनबोटे आणि जगदाळे कुटुंबांनी आपल्या वैयक्तिक दुःखावर मात करून समाजासाठी एकत्र उभे राहण्याचा प्रेरणादायी आदर्श निर्माण केला. त्यांची तीव्र देशभक्ती पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले.

एअर मार्शल बापट यांच्या संदेशात आत्मनिर्भर भारताच्या संरक्षण सज्जतेचा उल्लेख करण्यात आला. ब्रह्मोस, आकाश आणि आकाश तीर यांसारख्या स्वदेशी क्षेपणास्त्रांनी पाकिस्तानला स्पष्ट संदेश दिला आहे आणि आता देशाला आव्हान देणाऱ्यांना योग्य प्रत्युत्तर मिळेल, असे त्यांनी नमूद केले.

या तिरंगा यात्रेत केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे, खासदार मेधा कुलकर्णी, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, भीमराव तापकीर, हेमंत रासने, सुनील कांबळे, योगेश टिळेकर, माजी आमदार जगदीश मुळीक, श्रीनाथ भिमाले, संदीप खर्डेकर यांच्यासह विविध राजकीय आणि सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

------------------------------------------------------------------------------------------------------------------------

#Pune #Maharashtra

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा