अनेक राजकीय नेते आंदोलनात होणार सहभागी
मुंबई, १७ मे २०२५: अनुसूचित जातींमधील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या दुर्बल घटकांना न्याय मिळावा, यासाठी सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने २० मे २०२५ रोजी मुंबईतील आझाद मैदानावर 'आक्रोश महाआंदोलन' आयोजित करण्यात येत आहे. दुपारी १ वाजता सुरु होणाऱ्या या आंदोलनात आरक्षणाचे उपवर्गीकरण जून २०२५ पासून लागू करण्याची प्रमुख मागणी करण्यात येणार आहे.
या आंदोलनाचे उद्दिष्ट राज्य शासनाच्या विविध योजनांपासून आणि आरक्षणाच्या लाभांपासून वंचित राहिलेल्या लहान उपगटांना त्यांचे हक्क मिळवून देणे आहे. उपवर्गीकरणामुळे या दुर्लक्षित घटकांना शिक्षण, सरकारी नोकरी आणि योजनांचा थेट लाभ मिळू शकेल, असे मत आंदोलकांनी व्यक्त केले आहे.
विधानपरिषदेचे आमदार अमित गोरखे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या आंदोलनात विविध राजकीय पक्षांचे नेते आणि लोकप्रतिनिधी सहभागी होणार आहेत. यामध्ये आमदार सुनील कांबळे, आमदार जितेश अंतापूरकर, माजी आमदार मधुकरराव घाटे, माजी आमदार नामदेव जयराम ससाणे, माजी मंत्री रमेश बागवे, माजी मंत्री दिलीप कांबळे, अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्यासह पंडित सूर्यवंशी, मारुती वाडेकर, अशोक लोखंडे आणि राम चव्हाण यांसारख्या अनेक नेत्यांचा समावेश आहे.
सरकारने लवकरात लवकर आरक्षणाचे उपवर्गीकरण करून न्याय द्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. आमदार अमित गोरखे यांनी समाजातील बांधवांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
-----------------------------------------------
#Maharashtra #Mumbai #Reservation #Movement #Matangsamaj
Reviewed by ANN news network
on
५/१८/२०२५ ०३:३५:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: