खेड पंचायत समितीत दृष्टिहीनांसाठी ब्रेल लिपीचे माहिती फलक: कोकणातील पहिलाच उपक्रम
खेड, दि. १६ मे २०२५ - खेड येथील पंचायत समिती कार्यालयात दृष्टिहीन नागरिकांसाठी ब्रेल लिपीतील माहिती फलक लावण्यात आले असून, आता दृष्टिहीन व्यक्ती कोणाच्याही मदतीशिवाय या कार्यालयात सहजपणे हालचाल करू शकतील. कोकणातील अशा प्रकारचा उपक्रम राबविणारी खेड ही पहिलीच पंचायत समिती ठरली आहे.
गुरुवारी (दि. १५) सायंकाळी स्नेहज्योती अंध विद्यालय, घराडीच्या प्राचार्या प्रतिभा सेनगुप्ता यांच्या हस्ते या माहिती फलकाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. यावेळी स्नेहज्योती अंध विद्यालयातील एका दृष्टिहीन विद्यार्थिनीने स्वतः ब्रेल लिपीतील माहिती वाचून उपस्थितांची मने जिंकली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शंभर दिवस सुधारणा कार्यक्रमांतर्गत या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गणेश मंडलिक यांच्या संकल्पनेतून साकार झालेला हा उपक्रम आता राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे.
खेड पंचायत समितीच्या या प्रयत्नामुळे दृष्टिहीन बांधवांसाठी सरकारी सेवा अधिक सुलभ होणार आहे. समाजातील सर्व घटकांना समान संधी व सुविधा मिळाव्यात यासाठी पंचायत समिती प्रशासनाने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
कार्यक्रमास पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी विजय करपे, सहाय्यक प्रशासन अधिकारी परशुराम इचुर, कनिष्ठ प्रशासन अधिकारी अनुश्री आंब्रे, आरोग्य विस्तार अधिकारी नरेश इदाते, कृषी विस्तार अधिकारी गावडे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------------------------------------------------
#InclusiveGovernance #BrailleInitiative #AccessibilityForAll #VisuallyImpaired #RuralInclusion #KhedPanchayatSamiti #MaharashtraGov #CM100DaysProgram #DisabilityRights #DivyangFriendly
Reviewed by ANN news network
on
५/१७/२०२५ १२:३३:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: