डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनाने विज्ञानविश्वाची मोठी हानी; राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी वाहिली श्रद्धांजली
पुणे, दि. २० मे २०२५: ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या आणि संपूर्ण देशाच्या विज्ञानविश्वाचे मोठे नुकसान झाले आहे. ते केवळ एक महान खगोलशास्त्रज्ञ नव्हते, तर विज्ञानाच्या लोकाभिमुखतेचे जनक होते, अशा शब्दांत राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी महाराष्ट्र भूषण, पद्मभूषण डॉ. जयंत नारळीकर यांना श्रद्धांजली वाहिली.
राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, "ज्ञान, प्रज्ञा, सुलभता आणि साधेपणा यांचा संगम असलेल्या डॉ. नारळीकर यांनी विज्ञान जनसामान्यांपर्यंत पोहोचवले. त्यांनी अंधश्रद्धेवर प्रहार करत विज्ञानवादी विचार समाजात रुजवले. केंब्रिजमधील शिक्षण, टाटा मूलभूत संशोधन संस्थेतील महत्त्वपूर्ण योगदान, आयुका (IUCAA) ची स्थापना आणि मराठीतून विज्ञानलेखन हे सर्वच भारतीय विज्ञानविश्वासाठी दीपस्तंभ ठरले आहेत. आज आपण एका ज्ञानवृक्षाला मुकलो आहोत. त्यांची जाण ही केवळ वैज्ञानिक समुदायासाठीच नव्हे, तर प्रत्येक जिज्ञासू मनासाठी मोठी पोकळी निर्माण करणारी आहे. ही पोकळी भरून निघणे अशक्य आहे," असेही त्यांनी नमूद केले.
राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी डॉ. नारळीकर यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या.
-----------------------------------------------------------------------------------
#JayantNarlikar #MadhuriMisal #Condolences #Astronomer #Science #Maharashtra #Pune #RIP #IndianScience

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: