प्रशिक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने कुंभार कमवू शकतात महिन्याला ५० हजार ते १ लाख रुपये - डॉ. एस. पी. मिश्रा

 


आळंदी, दि. २९ (प्रतिनिधी): अखिल भारतीय प्रजापती कुंभकार महासंघ आणि वंश पारंपारिक इंटरप्रूनर्स अँड आर्टिजन्स चेंबर ऑफ कॉमर्स ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने माती कारागिरांच्या विकासावर आधारित राष्ट्रीय परिसंवाद नुकताच आळंदी येथील मुंबई फ्रुट वाला धर्मशाळेत संपन्न झाला. या परिसंवादात खादी ग्रामोद्योग आयोगाचे माजी संचालक आणि महात्मा गांधी ग्रामीण संशोधन संस्था, वर्धा येथील वरिष्ठ संशोधक व कुंभार कलेचे तज्ञ डॉ. शशि प्रकाश मिश्रा यांनी मार्गदर्शन केले.

डॉ. मिश्रा यांनी सांगितले की, खादी ग्रामोद्योग आयोगाच्या माध्यमातून त्यांनी हजारो कुंभार कारागिरांना प्रशिक्षण दिले. त्यांना आधुनिक मशिनरी अत्यंत कमी किमतीत उपलब्ध करून दिली, ज्यामुळे त्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली आहे. आज अनेक कुंभार कुटुंबे पॉटरीचे प्रशिक्षण घेऊन आणि आधुनिक उपकरणांचा वापर करून दरमहा किमान ५० हजार ते १ लाख रुपये कमवत आहेत, असे त्यांनी नमूद केले.

गोरगरीब कुंभार कारागिरांसाठी केलेल्या अथक कार्यामुळे डॉ. मिश्रा यांना ‘प्रजापती रत्न’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि भव्य ट्रॉफी असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय प्रजापती महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीशजी कुंकळेकर होते. त्यांच्यासोबत व्यासपीठावर गुजरातचे माजी राज्यसभा सदस्य दिनेश अनावाडिया, गुजरातचे माजी आमदार गोविंदभाई प्रजापती, गोव्याचे आमदार प्रमेंद्र शेट, राजस्थान माती कला बोर्डाचे अध्यक्ष प्रल्हाद टाक, छत्तीसगड माती कला बोर्डाचे अध्यक्ष शंभूनाथ, राष्ट्रीय महासचिव मनोज प्रजापत, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रंगनाथ सूर्यवंशी, विकास संस्थेचे प्रदेशाध्यक्ष ज्ञानेश्वर भागवत, माजी अध्यक्ष शाम शेठ राजे, राष्ट्रीय माती कला सेलचे अध्यक्ष दत्ता कुंभार, राष्ट्रीय संयोजक आर. बी. के. प्रजापती, लुनचंद सीनावाडिया आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते संत गोरोबाकाका यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर संयोजकांनी सर्व मान्यवरांचा सत्कार केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना दत्ताजी कुंभार म्हणाले की, महाराष्ट्र राज्यात त्यांच्या टीमने कुंभार समाज बांधवांना तीन हजार यांत्रिक चाके, अनेक ब्लंजर, पगमील, जिगर जॉली इत्यादी मशीन अल्प किमतीत देऊन कुंभार समाजाचे उत्पन्न पाचपट करण्याचे काम केले आहे.

यावेळी गुजरात येथील मिट्टी कूल कंपनीचे संस्थापक मनसुख भाई प्रजापती यांना ‘प्रजापती रत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. कमी शिक्षण असूनही त्यांनी मोठी कंपनी स्थापन केली आहे, जिथे मातीचे फ्रिज, भांडी, तवे, पाण्याच्या बाटल्या आणि पातेली यांसारख्या सुमारे शंभर वस्तू तयार केल्या जातात. त्यांनी आपल्या ब्रँडचे पेटंट घेतले असूनही, प्रजापती कुंभार समाजातील सर्वांनी या वस्तूंची नक्कल करून आपली उपजीविका चांगली करावी, असे आवाहन त्यांनी केले आणि त्यासाठी आवश्यक असलेले सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

डॉ. के. के. वर्मा आणि अंजनी किरोडीवाल यांनी मातीच्या भांड्यातील स्वयंपाकाचे महत्त्व सांगितले. मातीच्या भांड्यात बनवलेल्या अन्नाने बीपी, शुगर आणि इतर अनेक आजार होत नाहीत, असे मत त्यांनी शास्त्रीय आधारासह मांडले.

केंद्रीय ग्रामीण कुम्हारी प्रशिक्षण इन्स्टिट्यूट, खानापूर (कर्नाटक) चे प्राचार्य वेंकटेश कुंभार यांनी संस्थेत चालणाऱ्या कुंभारकाम प्रशिक्षणाबद्दल माहिती दिली. प्रजापती महासंघाने खानापूरच्या केंद्रीय कुम्हारी प्रशिक्षण संस्थेला ‘प्रजापती भूषण’ पुरस्कार देऊन सन्मानित केले. या संस्थेने हजारो विद्यार्थ्यांना पॉटरीचे प्रशिक्षण दिले आणि केवळ कुंभार समाजातच नव्हे, तर इतर समाजातीलही अनेक उद्योजक घडवले आहेत.

मातीचे अलंकार बनवणाऱ्या दीपा सोनजी गुरव यांना ‘प्रजापती भूषण’ पुरस्काराने गौरवण्यात आले. त्या सॉफ्टवेअर इंजिनिअर असून, कोरोनामध्ये नोकरी गेल्यानंतर त्यांनी खानापूर पॉटरी इन्स्टिट्यूट, बेळगाव येथे पॉटरीचे प्रशिक्षण घेतले आणि मातीच्या अलंकारांचे उत्पादन सुरू केले. या अलंकारांना मोठी मागणी असून, त्या सध्या आपल्या पूर्वीच्या पगारापेक्षा जास्त उत्पन्न मिळवत आहेत, असे त्यांनी सांगितले.

जयपूरचे राजेंद्र अर्जुन प्रजापती यांना ‘प्रजापती भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांनी राजस्थानमध्ये ७५ फूट उंचीचा धातूचा पुतळा तयार केला आहे. शिल्पकार विनायक यमाजी श्रीमंदिरकर, जे श्रीमंदिलकर फाईन आर्ट कॉलेज, मुंबईचे प्राचार्य आहेत, त्यांनी राष्ट्रीय संयोजक आर. बी. के. प्रजापती यांचे हुबेहूब मातीचे शिल्प तयार करून सर्वांची प्रशंसा मिळवली. त्यांनाही ‘प्रजापती भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यासोबतच शिल्पकार सीमा खेडकर शिर्के (पुणे), शिल्पकार गणेश कुंभार (उरळी), शिल्पकार संजयराव काळे (अहिल्यानगर) यांनाही ‘प्रजापती भूषण’ पुरस्काराने गौरवण्यात आले.

अमृत मातीचे अंजनी किरोडीवाल, अविनाश कुंभार, वाल्मीक शिरसाठ, ज्ञानेश्वर कुंभार, नितीन राजे, ज्ञानेश चिंदरकर, दामा प्रभाकर, शेखर कुडाळकर यांनी जिगर ज्वाली आणि आधुनिक उपकरणांचा वापर करून कुंभार कलेत प्रावीण्य मिळवले आणि उत्कृष्ट उद्योजक म्हणून महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त केले, त्याबद्दल त्यांना ‘प्रजापती भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

मातीच्या मूर्ती बनवणारे कलाकार रमाकांत नारायण, जयदेव शेट, अमरबाहू शेट, सोमनाथ कुंभार, अनिल शेटकर, खुशाली शेठ, गोपाळ शेटकर, संजय पळसकर, राजेंद्र बेहेरे, विनोद मांजरमपल्ली या मान्यवरांना मूर्ती कलेतील योगदानाबद्दल ‘प्रजापती भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

वीट उद्योगातील युवा उद्योजक कृष्णा सोनवणे (नाशिक), पद्माकर शिरसाठ (जळगाव), रमेश प्रजापती (इंदूर) आणि सुधाकर कुंभार (बारामती) यांना ‘प्रजापती भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कुंभश्रीचे संपादक संजय राजे यांनी उपस्थितांचे आभार मानले.



  • #PotteryTraining
  • #KumbharEmpowerment
  • #IncomeGeneration
  • #ClayArtisans
  • #मिट्टीकूल
  • #PrajapatiRatna
  • #PrajapatiBhushan
  • #Alandi
  • #RuralEconomy
  • #SustainableLiving
प्रशिक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने कुंभार कमवू शकतात महिन्याला ५० हजार ते १ लाख रुपये - डॉ. एस. पी. मिश्रा प्रशिक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने कुंभार कमवू शकतात महिन्याला ५० हजार ते १ लाख रुपये - डॉ. एस. पी. मिश्रा Reviewed by ANN news network on ५/२९/२०२५ ०७:३७:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".