पुणे, दि. २४ मे २०२५: पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट ३ ने हडपसर आणि लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत वाहन चोरी करणाऱ्या एका सराईत चोरट्याला अटक केली आहे. आकाश सुरेश वाघरी (वय २३ वर्षे, सध्या रा. शिवाजीनगर रेल्वे स्टेशन, पुणे) असे या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून ४० हजार रुपये किंमतीच्या चोरीच्या दोन होंडा शाईन मोटारसायकल जप्त केल्या आहेत.
गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी २० मे २०२५ रोजी गस्त घालत असताना, पोलीस अंमलदार अमित बोडरे आणि चेतन शिरोळकर यांना गुप्त माहिती मिळाली की आकाश वाघरी हा चोरीच्या विना नंबर प्लेटच्या मोटारसायकलसह मांजरी येथील पुनावाला चौकात सूर्यमुखी गणेश मंदिराजवळ थांबला आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आकाश वाघरी याला ताब्यात घेतले.
तपासादरम्यान आकाशने सांगितले की, त्याने ही होंडा शाईन मोटारसायकल १५ ते २० दिवसांपूर्वी मगरपट्टा, हडपसर येथून चोरली होती. मोटारसायकलला नंबर प्लेट नसल्याने पोलिसांनी चेसिस आणि इंजिन नंबरच्या आधारे तिचा खरा नंबर (एम. एच. १२ पी. एफ. ६३८७) शोधून काढला. ही गाडी २७ एप्रिल २०२५ रोजी मगरपट्ट्यातील टेस्टी पंजाब हॉटेलमधून चोरी झाली असल्याची तक्रार हडपसर पोलीस ठाण्यात दाखल होती.
आरोपी आकाशने अधिक चौकशीत आणखी एक होंडा शाईन मोटारसायकल लोणी काळभोर टोल नाक्याजवळून चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन ती गाडी (एम.एच.१२ एन.आर.०९९४) ताब्यात घेतली. ही गाडी २७ एप्रिल २०२५ रोजी कदमवाकवस्ती, लोणी काळभोर येथून चोरी झाली होती आणि याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता.
अपर पोलीस आयुक्त संजय पाटील, पोलीस उप आयुक्त निखिल पिंगळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगराव पवार आणि त्यांच्या टीमने ही यशस्वी कारवाई केली. अटक केलेल्या आरोपीला पुढील कारवाईसाठी हडपसर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.
--------------------------------------------------------------------------------------------------
#PuneCrime #VehicleTheft #Arrested #CrimeBranchUnit3 #HadapsarPolice #LoniKalbhorPolice #StolenVehicles #PuneNews

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: