पिंपरी (प्रतिनिधी) - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मोरवाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) प्रशिक्षणार्थी उच्च शिक्षणासाठी सज्ज झाले आहेत. नुकत्याच जाहीर झालेल्या बारावी परीक्षेच्या निकालात या संस्थेतील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश मिळवले आहे. संस्थेच्या ४३ विद्यार्थ्यांपैकी ३९ विद्यार्थी यशस्वी झाले असून, संस्थेचा निकाल ९०.७०% लागला आहे. यामुळे या प्रशिक्षणार्थ्यांना आता बारावी समकक्षतेचे राज्य मंडळाचे प्रमाणपत्र मिळाले असून, ते पुढील शिक्षण घेऊ शकणार आहेत, अशी माहिती मोरवाडी आयटीआयचे प्राचार्य शशिकांत पाटील यांनी दिली.
कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाच्या प्रस्तावानुसार शालेय शिक्षण विभागाने आयटीआय उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांना दहावी आणि बारावीची समकक्षता देण्यासंबंधी धोरण निश्चित केले आहे. यानुसार, महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्राचार्य शशिकांत पाटील यांच्या प्रयत्नांमुळे संस्थेने राज्य मंडळाचा संस्था संकेतांक प्राप्त केला.
या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे अर्ज भरणे, ते राज्य मंडळाच्या कार्यालयात जमा करणे आणि विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाची माहिती देणे यांसारख्या कामांची जबाबदारी संस्थेचे गटनिदेशक प्रकाश घोडके, निदेशक विक्रमसिंह काळोखे आणि विजय चावरिया यांनी यशस्वीपणे पार पाडली.
याव्यतिरिक्त, या निदेशकांनी विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले, त्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षांचे नियोजन केले आणि त्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित केले. त्यांच्या या प्रयत्नांमुळेच संस्थेतील विद्यार्थ्यांनी ९०.७०% चा उत्तम निकाल नोंदवत बारावी समकक्षतेचे प्रमाणपत्र मिळवले आहे आणि आता ते आत्मविश्वासाने पुढील शिक्षणासाठी तयार झाले आहेत.
-----------------------------------------

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: