पुणे, दि. २४: पुणे शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस उप-आयुक्त (विशेष शाखा) मिलिंद मोहिते यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१), (२) व (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. हे आदेश २७ मे २०२५ च्या ००.०१ वा. पासून ते ९ जून २०२५ च्या २४.०० वा. पर्यंत लागू राहतील. या काळात पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांच्या जमावाला आणि शस्त्रे, स्फोटक पदार्थ बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे.
शहरात विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांच्या आंदोलनांची शक्यता तसेच अतिक्रमण हटवण्याच्या कारवायांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता, पोलिसांनी हे प्रतिबंधात्मक पाऊल उचलले आहे.
या आदेशानुसार, खालील कृत्ये करण्यास मनाई करण्यात आली आहे:
- कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ, ज्वलनशील द्रव पदार्थ बरोबर नेणे.
- दगड, शस्त्रे, अस्त्रे, सोडावयाची किंवा फेकावयाची हत्यारे बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे.
- शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, दंड, काठ्या, बंदुका व शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे.
- कोणत्याही व्यक्तीच्या चित्राचे प्रतिकात्मक प्रेत, पुढाऱ्यांच्या चित्राचे किंवा प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे.
- मोठ्याने अर्वाच्च घोषणा देणे, सार्वजनिक टीका करणे, उच्चार गाणी गाणे, वाद्य वाजविणे.
- अशा प्रकारचे चित्रे, चिन्हे, फलक किंवा वस्तू तयार करणे, प्रदर्शन करणे किंवा प्रसारित करणे, ज्यामुळे सार्वजनिक नैतिकता किंवा सुरक्षा धोक्यात येईल.
- सभ्यता, नीतिमत्ता, राज्याची सुरक्षा धोक्यात येईल किंवा राज्य उलथून टाकण्यास प्रवृत्त करतील अशी आवेशपूर्ण भाषणे करणे किंवा हावभाव करणे, कोणतेही जिन्नस तयार करून त्याचा प्रसार करणे.
- ज्यायोगे कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल असे महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३७ (१) (२) (३) विरुद्ध वर्तन करणे.
या आदेशानुसार, पोलीस आयुक्त, पुणे शहर यांच्या पूर्व परवानगीशिवाय पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास, सभा घेण्यास किंवा मिरवणूक काढण्यास बंदी असेल.
शासकीय सेवेतील व्यक्ती आणि ज्यांना कर्तव्यपूर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक आहे, त्यांना हे आदेश लागू होणार नाहीत. तसेच, ३.५ फूट पर्यंत लांबीच्या लाठ्या बाळगणारे खाजगी सुरक्षा रक्षक, गुरखा किंवा चौकीदार यांनाही हे आदेश लागू नाहीत.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १३५ प्रमाणे कारवाई केली जाईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
---------------------------------------------------------------------------
#PunePolice #LawAndOrder #Section37 #ProhibitoryOrders #AssemblyBan #WeaponBan #PuneCity

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: