पुणे, १७ मे २०२५: लष्कर पोलिसांनी शहरातील रात्रंदिवस पादचाऱ्यांची लूट करणाऱ्या टोळीला अटक केली आहे. या टोळीतील प्रमुख आरोपी अनिकेत आरणे आणि त्याचे साथीदार आयान पठाण यांच्यासह एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ मे २०२५ रोजी एका व्यक्तीने लष्कर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. तक्रारीत, दोन अज्ञात व्यक्तींनी सिटीझन ट्रेडिंग बँकेजवळ त्यांच्याकडील मोबाईल हिसकावून घेतल्याचे म्हटले होते.
पोलिसांनी तपास सुरू केला असता, पोलीस उपनिरीक्षक राहुल घाडगे आणि शेखर मोकाटे यांना बातमीदारांकडून माहिती मिळाली की, हा गुन्हा भवानी पेठ येथील अनिकेत आरणे आणि त्याच्या साथीदारांनी केला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि आरोपींचा शोध सुरू केला.
पोलिसांना आरोपी भवानी पेठ परिसरात, नंबर प्लेट नसलेल्या अॅक्टिव्हा दुचाकीवरून ट्रिपल सीटवर जात असताना आढळले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरी केलेले मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली आहे. तपासात असेही निष्पन्न झाले आहे की, आरोपींनी लष्कर आणि खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीतही अनेक ठिकाणी पादचाऱ्यांची लूट केली आहे.
अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे श्री. प्रविणकुमार पाटील, पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ पुणे शहर श्रीमती स्मार्तना पाटील, सहा. पोलीस आयुक्त लष्कर विभाग पुणे श्री. दिपक निकम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. गिरीशकुमार दिघावकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रदिप पवार, पोलीस उप निरीक्षक राहुल घाडगे, पो.उप. निरीक्षक शेखर मोकाटे आणि त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
----------------------------------------------------
#PunePolice #Arrest #Robbery #Theft #Crime #Maharashtra
Reviewed by ANN news network
on
५/१८/२०२५ ०२:२८:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: