जन्म नव्हे तर क्षमता आणि तिचा वापर महत्त्वाचा - धीरज घाटे

 


भाजपा नेत्यांकडून समाजकारणाचा नवा पॅटर्न; वस्तीतील मुलांना मदत

पुणे, दि. २१ मे २०२५: "आपला जन्म कोणाच्या घरात झाला, आपण कुठल्या भागात वा वस्तीत राहतो हे महत्त्वाचे नाही, तर तुमची क्षमता किती आणि तुम्ही त्याचा वापर कसा करता यावरच तुमचे प्रावीण्य ठरते," असे उद्गार भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी काढले.

वारजे येथील छत्रपती शाहू महाराज वसाहतीतील सेवाव्रत फाउंडेशनच्या वतीने चालविल्या जात असलेल्या "वृंदावन शैक्षणिक व सर्वांगीण विकास प्रकल्पातील" मुलांच्या हस्ते धीरज घाटे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी घाटे यांच्या हस्ते मुलांना खेळाचे साहित्य आणि गोष्टींची पुस्तके भेट देण्यात आली.

घाटे म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्वर किंवा इतर अनेक महापुरुषांनी बालपणापासूनच कामाला सुरुवात केली आणि त्यांनी देशात, राज्यात मोठे कार्य केले." त्यांनी मुलांशी संवाद साधून त्यांना प्रेरणा दिली.

भाजपाचे प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर आणि नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी धीरज घाटे यांची शहराध्यक्ष पदी फेरनियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा आगळ्यावेगळ्या पद्धतीने सत्कार करण्याचे ठरविले होते.

"आम्ही क्रिएटिव्ह फाउंडेशनच्या माध्यमातून नेहमीच राजकारणापेक्षा समाजकारणावर भर देतो आणि म्हणूनच धीरजजींच्या अभिनंदनाचे फ्लेक्स लावण्यापेक्षा त्यांच्या हस्ते गरजू मुलांना आवश्यक वस्तू देऊन त्यांचा सन्मान करणे आम्हाला अधिक योग्य वाटले," असे संदीप खर्डेकर म्हणाले.

मंजुश्री खर्डेकर यांनी सांगितले की, त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या प्रकल्पाला भेट दिली तेव्हा मुलांनी खेळाचे साहित्य देण्याची मागणी केली होती. त्यानुसार धीरज घाटे यांच्या हस्ते क्रिकेट बॅट बॉल, बास्केटबॉल, फुटबॉल आणि गोष्टींची पुस्तके देण्यात आली.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी स्वागत गीत व छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा सादर केला. तसेच त्यांनी धीरज घाटे यांना विविध प्रश्न विचारले. मुलांनी स्वहस्ते बनविलेले ग्रीटिंग कार्ड देऊन धीरज घाटे यांना शुभेच्छा दिल्या.

"अनेक मोठ्या कार्यक्रमांना जाण्याचा योग येतो, पण हा कार्यक्रम आणि येथे झालेला सत्कार मनाला भावला," अशी भावना धीरज घाटे यांनी व्यक्त केली.

या वेळी प्रकल्प समन्वयक प्रदीप देवकुळे, भाजयुमो क्रीडा आघाडी अध्यक्ष प्रतीक खर्डेकर, वस्तीतील नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

--------------------------------------------------------

 #BJPPune #DhirajGhate #SocialInitiative #CreativeFoundation #SportsForAll #SandeepKhardekar #CommunityDevelopment #PuneWelfare

जन्म नव्हे तर क्षमता आणि तिचा वापर महत्त्वाचा - धीरज घाटे जन्म नव्हे तर क्षमता आणि तिचा वापर महत्त्वाचा - धीरज घाटे Reviewed by ANN news network on ५/२१/२०२५ ०३:१७:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".