"मी या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी पार पाडत आहे. गेल्या दीड-दोन वर्षांपासून, जेव्हापासून या रहिवाशांना पालिकेच्या व कोर्टाच्या नोटिसा आल्या, तेव्हापासून मी त्यांच्या संपर्कात आहे आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना आधार देण्याचे काम करत आहे," असे राहुल जाधव यांनी स्पष्टपणे नमूद केले.
रहिवाशांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये जाधव यांच्यावर लाखो रुपये घेतल्याचा आरोप केला असला तरी, त्यांनी या आरोपांचे खंडन केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, "सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने कारवाई केल्यामुळे त्या महिलेला वाटले की त्यांचा घर वाचवण्याचा शब्द पाळला गेला नाही. त्या आक्रोशामध्ये त्या भगिनीने माझे नाव घेतले असेल, परंतु हे केवळ त्यांच्या भावनिक परिस्थितीमुळे घडले आहे."
जाधव यांनी अनधिकृत प्लॉटिंगबाबत स्पष्ट केले की, "सतीश जरेने त्या ठिकाणी प्लॉटिंग केली, कोणत्या ग्राहकांनी कोणत्या परिस्थितीत जागा घेतली, हे मला माहित नाही. परंतु ज्यावेळी त्यांना कोर्टाच्या नोटिसा आल्या, तेव्हापासून मी त्यांच्या मदतीसाठी धावलो आहे."
प्रभावित रहिवाशांसाठी जाधव यांनी आश्वासक भूमिका घेतली आहे. "या प्रकरणी त्यांचे जे नुकसान झाले आहे, त्याचा मोबदला व्यवस्थित स्वरूपात त्यांना मिळेल," असे त्यांनी ठामपणे सांगितले.
----------------------------------------------------------------------------------------

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: