वणवे लावणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याखाली गुन्हे दाखल करा - उदय सामंत
रत्नागिरी, दि. २३ : वादळ-पावसापासून संरक्षण होण्याच्या दृष्टिकोनातून स्थलांतरित होण्यासाठी २१ बहुउद्देशीय निवारा केंद्रांसाठी शासनाने २४८ कोटी रुपये मंजूर केले आहेत. वाशिष्ठी नदीमधून गतवर्षी १ लाख १९ हजार क्युबिक मीटर गाळ काढण्यात आला असून डिसेंबर २०२१ पासून एकूण २० लाख ९९ हजार क्युबिक मीटर गाळ काढण्यात आला आहे, अशी माहिती देतानाच वणवे लावणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याखाली गुन्हे दाखल करा, अशी सूचना पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिली.
चिपळूण पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात चिपळूण व गुहागर तालुका मान्सूनपूर्व आढावा बैठक झाली. बैठकीला आमदार भास्कर जाधव, उप वनसंरक्षक गिरिजा देसाई, प्रांताधिकारी आकाश लिगाडे, तहसीलदार प्रवीण लोकरे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, “पुढील ४ महिने चांगले काम करा. गेल्या ४ दिवसात पडलेल्या पावसाने, निसर्गाने धोक्याची घंटा दिली आहे. आपत्कालीन घटना कोणत्याही तालुक्यात घडणार नाही, याची दक्षता घ्या. प्रांतांनी ज्या अधिकाऱ्यांवर, ज्या पथकांवर जी जबाबदारी दिली आहे, ती सतर्कतेने पूर्ण करा. त्याबाबत दररोज कामकाजाचा आढावा घेण्यात यावा. कृषी विभागाने दिलेले उद्दिष्ट पूर्ण करावे. खैर, बांबू लागवड करण्याबाबत शेतकऱ्यांना प्रवृत्त करा. वणवे लावणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याखाली गुन्हे दाखल करा.”
बियाणे, खते, त्याची मागणी, त्याची उपलब्धता, वाशिष्ठी नदीतून काढण्यात आलेला गाळ याबाबतही त्यांनी आढावा घेतला. प्रांताधिकारी लिगाडे यांनी संगणकीय सादरीकरण करून सविस्तर माहिती दिली. बैठकीला विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
-----------------------------------------------------------------------------------------------
#Ratnagiri #DisasterManagement #MonsoonPreparedness #MaharashtraGovernment #RainAlert
Reviewed by ANN news network
on
५/२३/२०२५ ०६:३२:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: