पिंपरी, २९ मे २०२५ – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित ‘विचार प्रबोधन पर्वा’चे उद्घाटन अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या हस्ते संपन्न झाले. अहिल्यादेवींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून तीन दिवसीय पर्वाची सुरुवात करण्यात आली.
उद्घाटनप्रसंगी तृप्ती सांडभोर म्हणाल्या की, “अहिल्यादेवींनी आपल्या कार्यकाळात समाजहिताचे व लोककल्याणाचे उदाहरण घालून दिले. त्यांच्या विचारांप्रमाणेच महानगरपालिका ही नागरिकांना आवश्यक सेवा-सुविधा देण्यासाठी कटिबद्ध आहे.”
कार्यक्रमाला माजी नगरसेवक राजू दुर्गे, जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सामाजिक कार्यकर्त्या विना सोनवलकर यांच्यासह विविध मान्यवर आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
‘खेळ पैठणीचा’ कार्यक्रमात महिलांचा उत्साह
‘विचार प्रबोधन पर्वा’च्या पहिल्या सत्रात ‘खेळ पैठणीचा’ हा विशेष कार्यक्रम सादर करण्यात आला. महिलांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. स्पर्धेतील प्रथम क्रमांकाची मानाची पैठणी सुनिता काळे, द्वितीय क्रमांक आरती पाटील, आणि तृतीय क्रमांक छाया नाईकवाडे यांनी पटकावला.
कार्यक्रमासाठी अतुल कड, बबन गायकवाड, जालिंदर नलावडे आदींचा विशेष सहभाग होता.
‘पुण्यश्लोक’ महानाट्यातून प्रभावी जीवनपट सादर
दुपारच्या सत्रात शाहीर यशवंत जाधव यांची शाहिरी आणि त्यानंतर धनंजय तानले प्रस्तुत, श्रीकृष्ण परांजपे लिखित, गणेश इनामदार दिग्दर्शित ‘पुण्यश्लोक’ हे महानाट्य सादर करण्यात आले. ६४ कलाकारांच्या प्रभावी अभिनयातून अहिल्यादेवींचा जन्म, विवाह, युद्धकौशल्य, राज्यकारभार व राष्ट्रनिष्ठा यांचे दर्शन घडले. महिलांसह नागरिकांनी या सादरीकरणाला प्रचंड प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रफुल्ल पुराणिक यांनी, तर सूत्रसंचालन रमेश भोसले यांनी केले.
दुसऱ्या दिवशी लोककला आणि व्याख्यानांचा कार्यक्रम
प्रबोधन पर्वाच्या दुसऱ्या दिवशी, आचार्य अत्रे रंगमंदिर येथे दुपारी ३ वाजता ‘सुवर्ण महाराष्ट्राचा लोकोत्सव’ — भूपाळी, वासुदेव, गोंधळी, धनगरी नृत्य, शाहिरी पोवाडे यांचा लोककला कार्यक्रम आणि सायंकाळी ५ वाजता सुप्रसिद्ध व्याख्याते नितीन बानगुडे पाटील यांचे व्याख्यान होणार आहे.
महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
#AhilyadeviHolkar #PimpriChinchwad #CulturalFestival #KhelPaithani #PunyashlokPlay #WomensEmpowerment #PCMCEvents #MaharashtraCulture #SocialReformers

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: