ए एन एन न्यूज नेटवर्क दिनांक ३० मे २०२५ बातमीपत्र (PODCAST)

 


ए एन एन न्यूज नेटवर्क

दिनांक ३० मे २०२५

आजचे बातमीपत्र

ठळक बातम्या

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विकास आराखड्यात आळंदीजवळ कत्तलखाना उभारण्याचा घाट!

उरणमध्ये मोठी राजकीय उलथापालथ; शरद पवार राष्ट्रवादीचे मातब्बर कार्यकर्ते अजित पवार राष्ट्रवादीमध्ये

वाढतोय चिकुनगुनिया, डेंग्यू आणि झिकाचा धोका; डासोत्पत्ती वेळीच रोखा! : पुणे महापालिकेचे आवाहन

पिंपरी चिंचवड विकास आराखड्यामध्ये पूररेषेत संदेहास्पद फ़ेरफ़ार?

महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडून कोळंबे कुटुंबियांचे सांत्वन; ४ लाखांची मदत

आता पाहूया सविस्तर बातम्या

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने जाहीर केलेला सुधारित विकास आराखडा (डीपी प्लॅन) एका नव्या वादात सापडला आहे. मोशी-डुडुळगावच्या हद्दीत, पवित्र आळंदी शहरापासून अगदी जवळ असलेल्या इंद्रायणी नदीच्या काठी मोशी येथील सर्वेक्षण क्रमांक ३२५ मध्ये हा कत्तलखाना प्रस्तावित केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे याच भूखंडाजवळ देहू-आळंदी मार्गावर महर्षी वेदव्यास प्रतिष्ठानच्या वेदश्री तपोवनच्या अगदी बाजूला आरक्षण क्रमांक ५/२२० अंतर्गत कत्तलखाना प्रस्तावित आहे. याशिवाय, कत्तलखान्याच्या शेजारीच सुमारे ४ एकर जागेवर जनावरांचा दवाखाना (आरक्षण क्रमांक ५/२२१) प्रस्तावित करण्यात आला आहे तब्बल ४ एकर जागेवर कत्तलखाना प्रस्तावित करण्यात आल्याने वारकरी संप्रदाय आणि हिंदुत्ववादी संघटनांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या पवित्र भूमीवर अशा प्रकारचा प्रस्ताव आणल्याने धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत, अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून येत आहे. माजी स्थायी समिती सभापती आणि माजी नगरसेविका सिमा सावळे यांनी या प्रस्तावाला कडाडून विरोध केला आहे. त्यांनी प्रशासनाच्या भूमिकेचा तीव्र निषेध नोंदवत म्हटले आहे की, "इंद्रायणी नदी आणि आळंदीसारख्या पावन स्थळाजवळ कत्तलखाना उभारण्याचा प्रशासनाचा विचार हा समस्त हिंदू समाज आणि वारकरी बांधवांच्या भावनांचा अपमान आहे.

उरण तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. प्रशांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. पक्षात प्रवेश करणाऱ्यांमध्ये माजी तालुकाध्यक्ष मनोज भगत, माजी कार्याध्यक्ष रमण कासकर, प्रवक्ते अजित पाटील, भेंडखळ ग्रामपंचायतीचे सदस्य लिलेश्वर भगत, माजी तालुका सरचिटणीस भूषण ठाकूर, उरण विधानसभा सरचिटणीस निलेश पाटील, ओबीसी सेलचे माजी तालुकाध्यक्ष मच्छिंद्र ठाकूर, तालुका सरचिटणीस नामदेव मढवी, जासई विभाग अध्यक्ष दीपक पाटील, संतोष ठाकूर, गायकवाड आदींचा समावेश आहे. या सर्व पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात पक्षप्रवेश केला. यावेळी विद्यमान तालुकाध्यक्ष परीक्षित प्रकाश ठाकूर, प्रदेश सरचिटणीस गर्जे, आनंद परांजपे, वैजनाथ ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात डासजन्य आजारांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पुणे महानगरपालिकेने नागरिक, सोसायटी चेअरमन आणि विविध आस्थापनांच्या प्रमुखांना महत्वाचे आवाहन केले आहे. डासोत्पत्ती रोखण्यासाठी महापालिकेने काही नियम आणि दक्षता घेण्याच्या सूचनाही जारी केल्या आहेत. आरोग्य अधिकारी डॉ. निना बोराडे यांनी सांगितले की, झिका, डेंग्यू, चिकुनगुनिया यांसारख्या डासजन्य आजारांचा धोका टाळण्यासाठी घरात व परिसरात पाणी साचणार नाही यासाठी काळजी घेणे अत्यावश्यक आहे.

पिंपरी चिंचवड शहराच्या प्रस्तावित विकास आराखड्यातील एक अत्यंत गंभीर आणि कळीचा मुद्दा म्हणजे पूररेषा. शहरातील तीन प्रमुख नद्यांच्या पूररेषेच्या आखणीत मोठा फेरफार आणि गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप काही माजी लोकप्रतिनिधींकडून होत आहे. या आरोपामुळे शहराच्या विकास नियोजनासंदर्भात मोठा संशय निर्माण झाला असून, काही विशिष्ट हितसंबंध जपण्यासाठी नियमांचे उल्लंघन केल्याचा दावा या प्रकरणात केला जात आहे.या संदर्भात असे समजते की, महानगरपालिकेने अनेक वर्षांपूर्वी निश्चित केलेल्या पूररेषेच्या नकाशात आता बदल करण्यात आले आहेत. नैसर्गिक आपत्ती आणि संभाव्य पूर परिस्थितीचा विचार करून तयार करण्यात आलेल्या या नकाशात फेरबदल करणे गंभीर आणि चिंताजनक आहे. विशेष म्हणजे, हे बदल करताना काही विशिष्ट भूखंडधारकांना आणि विकासकांना फायदा पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचा आरोप होत आहे.

दापोली तालुक्यातील वणंद येथे नदीत पाण्याच्या प्रवाहाने राजेंद्र सोनू कोळंबे यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेची माहिती मिळताच महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी कोळंबे यांच्या घरी जाऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. त्यांनी शासनाच्या वतीने ४ लाख रुपयांचा मदतीचा धनादेश कुटुंबियांकडे सुपूर्द केला. योगेश कदम यांनी कोळंबे यांच्या कन्या प्रज्ञा, जिने बारावीत ८३ टक्के गुण मिळवले आहेत, तिची विचारपूस केली आणि तिला तसेच तिच्या दहावीत शिकणाऱ्या भावाला पुढील शिक्षणासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी दापोलीचे प्रांताधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, तहसीलदार अर्चना बोंबे, किशोर देसाई, उन्मेष राजे, भगवान घाडगे, जिल्हा बँकेचे संचालक सुधीर कालेकर, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या चारुता कामतेकर, गिम्हवणे वणंद ग्रुप ग्रामपंचायत सदस्य निलेश कांगणे, माजी उपसरपंच किशोर काटकर, माजी नगरसेवक सचिन जाधव, मोहन शिगवण, आणि सुनील गुरव उपस्थित होते.

बातमीपत्र संपले. धन्यवाद!

 ---------------------------------------------------------------------------------------------

Maharashtra News, Pune News, Pimpri Chinchwad News, Uran Political News, Traffic Rules, AI Cameras, Dengue, Chikungunya, Zika, Flood Line, Compensation.

 #Maharashtra #Pune #PimpriChinchwad #UranPolitics #TrafficRules #AICameras #Dengue #Chikungunya #ZikaAlert #FloodLineControversy #YogeshKadam #NewsToday

 

 


ए एन एन न्यूज नेटवर्क दिनांक ३० मे २०२५ बातमीपत्र (PODCAST) ए एन एन न्यूज नेटवर्क  दिनांक ३० मे २०२५   बातमीपत्र (PODCAST) Reviewed by ANN news network on ५/३०/२०२५ ०७:४३:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".