मांग, मातंग समाजाच्या आरक्षणासाठी मुंबईत लाखोंचा जनसमुदाय

 


सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्रात तातडीने आरक्षण उपवर्गीकरण लागू करा; सकल मातंग समाजाचा मुंबईत जनआक्रोश

मुंबई, दि. २० मे २०२५: सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या मांग, मातंग आणि इतर संबंधित समाजांना आरक्षणाचे योग्य वर्गीकरण करून न्याय मिळावा, या प्रमुख मागणीसाठी आज मुंबईतील आझाद मैदानात सकल मातंग समाजाच्या वतीने विराट जनआक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला होता. या आंदोलनात सत्ताधारी पक्षाचे आमदार, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण व्यक्ती आणि लाखो नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाच्या वर्गीकरणाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय दिल्यानंतर तेलंगणा आणि कर्नाटक या राज्यांनी त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. मात्र, महाराष्ट्र सरकारने अद्याप याबाबत कोणतीही ठोस पाऊले उचलली नसल्यामुळे सरकारला जागे करण्यासाठी हा जनआक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला होता, असे मत आमदार अमित गोरखे यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की, मातंग समाज नेहमीच महायुतीसोबत राहिला आहे.

यावेळी बोलताना राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मातंग समाजाच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मागणीची दखल घेतली. ते म्हणाले की, येत्या १५ दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली जाईल. महसूल मंत्री आणि पक्षाचा प्रदेशाध्यक्ष या नात्याने याची सर्वस्वी जबाबदारी मी घेतो, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

सकल मातंग समाजातर्फे यावेळी अनेक प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या. यात प्रामुख्याने आरक्षणाचे वर्गीकरण करून मातंग आणि त्यांच्या उपजातींना शिक्षण आणि नोकरीमध्ये स्वतंत्र आरक्षणाची तरतूद करावी, तसेच सध्या सुरू असलेल्या वैद्यकीय आणि तंत्रशिक्षण यांसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्येही वर्गीकरणानुसार प्रवेश आणि सवलती मिळाव्यात, यांचा समावेश होता. यासोबतच, आंध्र प्रदेशात मादिगा समाजाच्या विकासासाठी लागू केलेले मॉडेल महाराष्ट्राने स्वीकारावे आणि अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या निधीच्या संरक्षणासाठी तेलंगणाच्या धर्तीवर कायदा करावा, अशी मागणीही करण्यात आली.

या जनआक्रोश मोर्चामध्ये आमदार अमित गोरखे, आमदार सुनील कांबळे, आमदार जितेश अंतापुरकर, आमदार हेमंत ओगले, माजी मंत्री रमेश बागवे, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, माजी मंत्री दिलीप कांबळे, माजी आमदार अविनाश घाटे, माजी आमदार ससाणे, माजी आमदार सुधाकर भालेराव, माजी आमदार गुंडिले, माजी आमदार थोरात, माजी आमदार राजू आवळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आनंदा गुंडले, विष्णू भाऊ कसबे, ॲड. राम चव्हाण, मारुती वाडेकर, सुधार धूपे, पंडित सूर्यवंशी, श्री मुखेडकर यांच्यासह समाजाचे अनेक प्रमुख नेते उपस्थित होते. आझाद मैदानात सुमारे एक लाखापेक्षा जास्त समाजबांधव एकत्र आले होते.

मोर्चाच्या सुरुवातीला आमदार अमित गोरखे यांनी प्रास्ताविक भाषण केले, तर मारुती वाडेकर यांनी आभार प्रदर्शन केले.

पुढील १५ दिवसात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; महसूल मंत्री बावनकुळे यांचे आश्वासन

यावेळी बोलताना राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आंदोलकांची मागणी मान्य करण्याचे आश्वासन दिले. ते म्हणाले की, आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची मागणी लवकरच पूर्ण करण्यासाठी पुढील १५ दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एक बैठक आयोजित केली जाईल. महसूल मंत्री आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष या नात्याने याची सर्वस्वी जबाबदारी मी स्वीकारतो, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

--------------------------------------

#Reservation #SubCategorization #MatangSamaj #SocialJustice #Maharashtra #Protest #Mumbai #SupremeCourt #India

मांग, मातंग समाजाच्या आरक्षणासाठी मुंबईत लाखोंचा जनसमुदाय मांग, मातंग समाजाच्या आरक्षणासाठी मुंबईत लाखोंचा जनसमुदाय Reviewed by ANN news network on ५/२०/२०२५ ०५:२१:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".