सीसीटीव्ही फुटेज आणि बातमीदाराच्या मदतीने स्विगी डिलिव्हरी बॉयला अटक
पुणे: सहकारनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र चोरणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अवघ्या १२ तासात अटक केली आहे. अमोल किसन नाकते (वय २७) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तो स्विगी कंपनीचा डिलिव्हरी बॉय असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी त्याच्याकडून ९० हजार रुपये किंमतीचे दोन तोळे सोने आणि गुन्ह्यात वापरलेली ६० हजार रुपये किंमतीची दुचाकी तसेच चोरी केलेले सोने गहाण ठेवून मिळालेले १ लाख रुपये असा एकूण २ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ मे २०२५ रोजी सकाळी धनकवडी परिसरातील हिलटॉप सोसायटीजवळ एक महिला मॉर्निंग वॉक करत असताना दुचाकीवरून आलेल्या एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसका मारून चोरून नेले. याप्रकरणी सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०४, ३०९ (६) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन सहकारनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल गौड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तातडीने तपास सुरू केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील आणि त्यांच्या पथकाने परिसरातील सुमारे १५० सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये आरोपी स्विगी कंपनीचा डिलिव्हरी बॉय असल्याचे दिसून आले. पोलीस अंमलदार सागर सुतकर आणि योगेश ढोले यांना बातमीदारांकडून माहिती मिळाली की, सदर गुन्ह्यातील आरोपी गणेश चौक, आंबेगाव पठार येथे कोणाची तरी वाट पाहत आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून अमोल नाकते याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ २ श्रीमती स्मार्तना पाटील, सहा. पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गौड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती सुरेखा चव्हाण आणि तपास पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही कामगिरी केली. आरोपीला न्यायालयाने २० मे २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील करत आहेत.
--------------------------------------------------------------------------------------------
#PuneCrime #ChainSnatching #SahakarnagarPolice #SwiftAction #Arrested #PunePolice

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा