सोमवार, १९ मे, २०२५

खेड लोटे औद्योगिक वसाहतीत भीषण आग!

कोट्यवधींचे नुकसान, जीवितहानी टळली

खेड, दि. १९: खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमधील एका रासायनिक कारखान्यात आज (रविवार) दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. आगीचे मोठे लोळ तीन ते चार किलोमीटर अंतरावरूनही स्पष्टपणे दिसत असल्याने आगीची तीव्रता लक्षात येत होती. या दुर्घटनेत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. प्राथमिक माहितीनुसार, ही आग लासा कंपनीच्या परिसरात लागली असून, परिसरातील इतर कारखान्यांवरही धोक्याची शक्यता निर्माण झाली होती.

घटनास्थळी लोटे औद्योगिक वसाहतीचे अग्निशमन दल तातडीने दाखल झाले असून, आग विझवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. येथील लासा सुपर जिनेरिक्स या कारखान्यात आग लागली, त्यावेळी रविवार असल्याने कारखान्यात कामगारांची संख्या अत्यल्प होती. आगीची माहिती मिळताच कारखान्यातील सर्व कर्मचारी आणि कामगार तत्काळ बाहेर पडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही, अशी माहिती घटनास्थळावरून मिळाली आहे. मात्र, या आगीत कारखान्याचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

आगीचे वृत्त समजताच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (MIDC) दोन अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. त्यानंतर चिपळूण नगरपालिकेचा अग्निशमन दलाचा बंबही घटनास्थळी दाखल झाला. पंचक्रोशीतील शेकडो नागरिक घटनास्थळावर जमा झाले होते.

सुरक्षा यंत्रणेवर नागरिकांचा सवाल:

कारखान्यात पुरेशी सुरक्षा यंत्रणा आणि फायर हायड्रंट सिस्टीम उपलब्ध नसल्यामुळे सुरुवातीच्या आगीवर नियंत्रण मिळवणे कारखाना व्यवस्थापनाला शक्य झाले नाही, असा आरोप पंचक्रोशीतील नागरिकांकडून केला जात आहे. सुरक्षिततेचे नियम धाब्यावर बसवून व्यवसाय करणाऱ्या या कारखानदारांवर कोणाचा वरदहस्त आहे, असा संतप्त सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे.

लोटे औद्योगिक वसाहतीतील अपघात नित्याचे झाले असून, रासायनिक कंपन्या चालवताना सुरक्षिततेच्या नियमांचे उल्लंघन केले जात आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी असलेले कारखाना निरीक्षक कोल्हापूर येथून लक्ष ठेवतात. त्यामुळे कारखाना निरीक्षकांचे कार्यालय औद्योगिक वसाहतीच्या जवळ असावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. हे वाढते अपघात पाहता तरी आता हे कार्यालय येथे स्थलांतरित होईल, अशी आशा भाजपचे तालुकाध्यक्ष विनोद चाळके यांनी व्यक्त केली आहे.

----------------------------------------------------------------------------

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा