पुणे, दि. २४ मे २०२५: चिंचवडमधील शाहुनगर येथील ओम साई हौसिंग सोसायटीमध्ये प्रशासनाने जप्त केलेल्या आणि सीलबंद केलेल्या फ्लॅटमध्ये अनधिकृतपणे प्रवेश केल्याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जालिंदर राजाराम कदम असे या आरोपीचे नाव आहे. तो याच सोसायटीतील जी ब्लॉक, फ्लॅट क्रमांक ०९ चा रहिवासी आहे.
ही घटना ३ मे २०२५ ते २३ मे २०२५ या दरम्यान घडली. फिर्यादी, मुंबई येथील इन्फिनिटी फिनकॉर्प सोल्युशन प्रा. लि. मध्ये लिगल एक्झीक्युटिव्ह म्हणून कार्यरत असलेल्या महिलेने आरोपी कदम याला फ्लॅट खरेदीसाठी कर्ज दिले होते. मात्र, कदम याने कर्जाचे नियमित हप्ते भरले नाहीत. त्यामुळे ६ जानेवारी २०२५ रोजी पिंपरी चिंचवडच्या अपर तहसीलदारांच्या उपस्थितीत, दोन पंच आणि पोलिस बंदोबस्तात हा फ्लॅट जप्त करून सीलबंद करण्यात आला होता.
असे असतानाही, आरोपी जालिंदर कदम याने सीलबंद फ्लॅटचे कुलूप तोडले आणि जप्तीची नोटीस फाडून त्यामध्ये अनधिकृतपणे प्रवेश केला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर फिर्यादी महिलेने निगडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३२९(४) आणि ३३१(१) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. पोलिस उपनिरीक्षक कुटे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
----------------------------------------------------------------
#PuneCrime #Chinchwad #IllegalTrespass #SealedProperty #LoanDefault #NigdiPolice #IndianJusticeCode #PoliceInvestigation #MaharashtraNews

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: