ग्राम महसूल अधिकारी योगिता कचकुरे यांनी स्वीकारली लाच, मंडळ अधिकारी टिळे यांनी केली मागणी
नाशिक: इगतपुरी तालुक्यातील दोन महसूल अधिकाऱ्यांकडून लाच घेतल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे. शेतजमिनीच्या नोंदणी प्रकरणी एकूण १५ हजार रुपयांची लाच मागणी करणाऱ्या दोन अधिकाऱ्यांविरुद्ध गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात योगिता धुराजी कचकुरे, ग्राम महसूल अधिकारी, सजा मोडाळे या पदावर कार्यरत असून त्यांनी १० हजार रुपयांची लाच स्वीकारली आहे. तसेच दत्तात्रय मनोहर टिळे, मंडळ अधिकारी, वाडीवहे यांनी ५ हजार रुपयांची लाच मागणी केली होती.
प्रकरणाचा तपशील पाहता, तक्रारदाराच्या आई-वडिलांच्या नावावरील शेतजमिनीच्या मिळकतीच्या गाव नमुना सातवर न्यायालयाच्या निकालापर्यंत तिसऱ्या व्यक्तीशी व्यवहार करण्यास प्रतिबंधाची नोंद होती. न्यायालयाने निकाल दिल्यानंतर त्यांच्या आदेशानुसार ही नोंद रद्द करणे आवश्यक होते.
या नोंदीच्या बदल्यात योगिता कचकुरे यांनी १० हजार रुपये लाच मागितली होती आणि दत्तात्रय टिळे यांनी ५ हजार रुपयांची मागणी केली होती. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक कार्यालयात तक्रार दिली.
लाप्रवि विभागाच्या नाशिक पथकाने पडताळणी करून सापळा रचला. या सापळा कारवाईत योगिता कचकुरे यांना १० हजार रुपये लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. तसेच दत्तात्रय टिळे यांनाही ५ हजार रुपयांची मागणी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली.
या दोन्ही अधिकाऱ्यांविरुद्ध २२ मे २०२५ रोजी इगतपुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक १०६/२०२५ अंतर्गत भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, भ्रष्टाचारासंबंधी माहिती असल्यास किंवा लाच मागणाऱ्या लोकसेवकांविषयी तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्र, नाशिक येथे संपर्क करावा.
=================================
#Nashik #Corruption #LandFraud #Bribery #ACBCatch

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: