'संशय कल्लोळ व्हाया स्वयंवर' नाट्याविष्काराला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे : भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजित दोन अंकी 'संशय कल्लोळ व्हाया स्वयंवर' या नाट्याविष्काराला रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शनिवारी, २६ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता सेनापती बापट रस्त्यावरील भारतीय विद्या भवन येथे हा नाट्याविष्कार सादर करण्यात आला. 'स्वरराज छोटा गंधर्व प्रतिष्ठान, पुणे' या संस्थेने हा कार्यक्रम प्रस्तुत केला.
या सांस्कृतिक उपक्रमांतर्गत सादर झालेला हा २४२ वा कार्यक्रम ठरला. कार्यक्रमाची सुरुवात भारतीय विद्या भवनचे मानद सचिव नंदकुमार काकिर्डे यांच्या प्रास्ताविकाने झाली.
नाट्याविष्काराचे लेखन श्रीनिवास भणगे यांनी केले असून, दिग्दर्शन अशोक अवचट यांचे होते. संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी सुचेता अवचट यांनी सांभाळली. डॉ. ऋतूपर्ण पिंगळे, मंजुषा जोशी, स्मिता पाटील यांच्यासह वेदवती परांजपे आणि सन्मिता धापटे-शिंदे यांनी प्रमुख भूमिका साकारल्या.
संगीताची रंगत संजय गोगटे (ऑर्गन), विद्यानंद देशपांडे (तबला) आणि सविता सुपनेकर (व्हायोलिन) यांनी वाढवली. नेपथ्याचे काम मनोरंजन, पुणे यांचे, तर वेशभूषेची जबाबदारी सयाजी शेणकर यांनी सांभाळली. चारुशीला केळकर निर्मिती प्रमुख म्हणून कार्यरत होत्या. सूत्रसंचालन अभिषेक अवचट यांनी केले व प्रकाश योजना हरीश ढोकळे यांनी केली.
कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आला होता. "सर्व नवीन आणि तरुण कलाकार घेऊनच हे प्रतिष्ठान संगीत नाटक व विविध कार्यक्रम सादर करते, कारण नवीन पिढी तयार करणे हा आमचा उद्देश आहे," असे सुचेता अवचट यांनी सांगितले.
कार्यक्रमाला माजी पोलिस महासंचालक डॉ. प्रवीण दीक्षित, लेखक श्रीनिवास भणगे, सुहास पठारे, अविनाश शेठजी, मोहन कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवर आणि रसिक प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: