रत्नागिरी : मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील ८०० ज्येष्ठ नागरिक अयोध्येला रामलल्लाच्या दर्शनासाठी रवाना झाले. रत्नागिरी रेल्वे स्थानकावर आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते फित कापून या उपक्रमाचा शुभारंभ झाला. यावेळी डॉ. सामंत यांनी सर्व ज्येष्ठांना "सुरक्षित जा, सुरक्षित या" अशा शुभेच्छा दिल्या.
कोकणातील ही पहिली तीर्थदर्शन रेल्वे असून, ६० वर्षांवरील नागरिकांना मुलांवर अवलंबून न राहता तीर्थदर्शनाची संधी मिळावी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही योजना सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक लाभार्थ्याला ३० हजार रुपयांचे अनुदान देण्यात येत आहे. प्रवासादरम्यान सर्व ज्येष्ठांची काळजी घेण्यासाठी आरोग्य पथकाची व्यवस्था करण्यात आली आहे.
डॉ. सामंत यांनी आपल्या भाषणात सांगितले की, "जसे मुले आपल्या आईवडिलांची सेवा करतात, त्यापेक्षा अधिक काळजी सर्व अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी ज्येष्ठांची घ्यावी." तसेच, या प्रवासात कोणत्याही प्रकारची कमतरता भासू नये यासाठी पाण्याची, जेवणाची व स्वच्छतेची उत्तम व्यवस्था करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त दीपक घाटे, जनसंपर्क अधिकारी संजय भोसले, टुरिझम असिस्टंट मॅनेजर संजय शर्मा, प्रादेशिक व्यवस्थापक शैलेश बापट, प्रांताधिकारी जीवन देसाई, राहुल पंडित, माजी सभापती बाबू म्हाप, माजी नगराध्यक्ष बंड्या साळवी, बिपीन बंदरकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या वेळी पालकमंत्री डॉ. सामंत यांनी काही दिवसांपूर्वी काश्मीरमध्ये घडलेल्या प्रकाराचा जाहीर निषेधही व्यक्त केला. तसेच, ज्येष्ठ नागरिकांचा तुळशीमाळ घालून सन्मान करण्यात आला. प्रतीकात्मक स्वरूपात काही ज्येष्ठांना अयोध्याला जाण्यासाठी रेल्वे तिकिटे देण्यात आली.
डॉ. सामंत यांनी आश्वासन दिले की, प्रवासानंतर जेव्हा ते पुन्हा रत्नागिरीत येतील, तेव्हा ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्या प्रवासाचा अनुभव सांगताना "घरच्यांपेक्षा अधिक चांगली काळजी घेण्यात आली" असे समाधानाने म्हणावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शक्य असल्यास, रेल्वे परत येताना ते स्वतः ज्येष्ठ नागरिकांच्या स्वागतासाठी रेल्वे स्थानकावर उपस्थित राहण्याचा प्रयत्न करतील, असेही त्यांनी नमूद केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: