एसआरए अंतर्गत घरांच्या एफएसआय वाढीचे श्रेय मिसाळ यांना
पुणे : "लाडकी बहिण योजना अमलात आणली त्यावेळी आम्हाला मोठ्या प्रमाणात टीका सहन करावी लागली होती. काही जणांनी ही योजना फसवी असल्याचा ठपका ठेवला, परंतु आजपर्यंत आम्ही अडीच कोटी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले आहेत," असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पर्वती मतदारसंघातील आमदार माधुरी मिसाळ यांच्या प्रचार सभेत केले. या योजनेविरोधात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी न्यायालयात देखील दाद मागितली होती; तथापि, आम्ही ही योजना बंद होऊ दिली नाही आणि भविष्यात देखील ती चालू ठेवणार असल्याचे फडणवीस यांनी ठामपणे सांगितले.
बुधवारी बिबवेवाडी येथे यशवंतराव चव्हाण शाळेसमोर झालेल्या जाहीर सभेत फडणवीस बोलत होते. या वेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, माजी मंत्री पंकजा मुंडे, शहराध्यक्ष धीरज घाटे, आमदार माधुरी मिसाळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सभेत मिसाळ यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन देखील करण्यात आले.
फडणवीस म्हणाले, "पुण्यात प्रचाराची सुरुवात करावी हा प्रस्ताव समोर आला तेव्हा आम्ही पर्वती मतदारसंघात प्रचाराचा नारळ फोडण्याचे ठरवले. माधुरी मिसाळ यांचा हा विजय रेकॉर्ड ब्रेक ठरेल. एसआरएच्या नियमानुसार एफएसआय वाढवण्याचे श्रेय मिसाळ यांनाच जाते. त्यातून २०,००० घरांची निर्मिती होऊन गरिबांना ४७० स्क्वेअर फूटांचे मोठे घर उपलब्ध होणार आहे. पुण्याच्या वाहतूक समस्या सोडवण्यासाठी २०,००० कोटींच्या रिंग रोडची निर्मिती सुरू आहे."
पंकजा मुंडे म्हणाल्या, "या सभेला मोठ्या प्रमाणात उपस्थिती मिळाली असून हा विजयाचा शुभसंकेत आहे. माधुरी मिसाळ यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न केले आहेत."
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मतदारांनी आता चौथा विजय मिळवून द्यावा, असे सांगत पुण्यातील सर्व जागा महायुती जिंकण्याची खात्री व्यक्त केली.
माधुरी मिसाळ म्हणाल्या, "पक्षाने मला पुन्हा उमेदवारी दिली आहे. सत्ता नसतानाही दुप्पट कामे केली आणि आता मतदारसंघातील लोकांना गतिमान व कार्यक्षम महायुतीला पुन्हा पाठिंबा देण्याचे आवाहन करते."
सभेतील वातावरण आणि उपस्थितांच्या प्रतिसादाने आगामी निवडणुकीत महायुतीच्या विजयाची आशा निर्माण झाली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: