खडकवासला-स्वारगेट-खराडी मेट्रो मार्गाला मंजुरी
पुणे : पर्वती मतदारसंघातील सर्व प्रभागांमध्ये मेट्रोची सुविधा मिळणार असल्याचे आमदार माधुरी मिसाळ यांनी सांगितले. स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गासह खडकवासला-स्वारगेट-खराडी या दुसऱ्या टप्प्यातील मेट्रोला राज्य शासनाची मान्यता मिळाली आहे.
वाळवेकर गार्डन परिसरात नागरिकांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. "स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड आणि वनाज ते रामवाडी असा 33 किलोमीटरचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. स्वारगेट मेट्रो स्टेशनला प्रवाशांची पहिली पसंती मिळत आहे," असे त्या म्हणाल्या.
मेट्रोमुळे उद्योग, व्यवसाय आणि रोजगार संधींमध्ये वाढ होणार असून, शहराची उपनगरे जोडली जात आहेत. स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड प्रवास 27 मिनिटे 20 सेकंदांत, तर स्वारगेट ते शिवाजीनगर आणि मंडईपर्यंतचा प्रवास अनुक्रमे 5 मिनिटे 27 सेकंद व 3 मिनिटांत पूर्ण होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास माजी नगरसेवक महेश वाबळे, आनंद रिठे, प्रशांत जगताप यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: