श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचा सामाजिक बांधिलकीचा उपक्रम
चिरनेर (उरण) (प्रतिनिधी) - श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेने दरवर्षीप्रमाणे यंदाही सामाजिक बांधिलकी जपत उरण तालुक्यातील चिरनेर येथील अक्कादेवी वाडीतील आदिवासी बांधवांना दिवाळी फराळाचे वाटप केले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते माधव म्हात्रे व कुमार ठाकूर उपस्थित होते, तर बेलपाडाचे सामाजिक कार्यकर्ते महेश पाटील यांनी अध्यक्षस्थान भूषवले. या मान्यवरांच्या हस्ते आदिवासी बांधवांना फराळाचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना महेश पाटील यांनी संस्थेच्या विविध समाजोपयोगी उपक्रमांचे कौतुक केले. शिक्षक सनी दिलीप बोरसे यांनी संस्थेच्या कार्याची ओळख करून दिली.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संस्थेचे अध्यक्ष सुदेश पाटील, कार्याध्यक्ष विठ्ठल ममताबादे, ओमकार म्हात्रे, प्रेम म्हात्रे, कुमार ठाकूर, भाविक पाटील, सुविधा म्हात्रे, शुभम ठाकूर, माधव म्हात्रे, सानिका म्हात्रे, मुकेश म्हात्रे, समीर पाटील, प्रकाश म्हात्रे यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सुदेश पाटील यांनी उपस्थित मान्यवर आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रसार करणारी ही संस्था विविध सामाजिक उपक्रमांद्वारे गरजूंना मदत करत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: