कलाकारांच्या रांगोळी कलेने जिंकली प्रेक्षकांची मने
उरण (प्रतिनिधी) : दिवाळीनिमित्त रंगवली कलादर्शन उरण आणि लायन्स क्लब ऑफ उरण यांच्या संयुक्त विद्यमाने एन.आय. हायस्कूल येथे भव्य रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवारी एन.आय. हायस्कूलचे चेअरमन सदानंद गायकवाड, लायन चंद्रकांत ठक्कर आणि संजीव अगरवाल यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. ९ नोव्हेंबरपर्यंत चालणारे हे प्रदर्शन सकाळी १० ते दुपारी १ आणि संध्याकाळी ४ ते रात्री ९ या वेळेत विनामूल्य पाहता येणार आहे.
थ्रीडी रांगोळी, व्यक्तिचित्रे आणि निसर्गचित्रे अशा विविध प्रकारच्या रांगोळ्या या प्रदर्शनात सादर करण्यात आल्या आहेत. ५० वर्षांची कलाकारकीर्द पूर्ण केलेले ज्येष्ठ कलाकार नंदकुमार साळवी यांच्या कलाकृतींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
दर्शन पाटील, सिद्धार्थ नागवेकर, नवनित पाटील, सत्या कडू, संतोष पाटील, राजेश नागवेकर, स्वप्नाली मणचेकर, ध्रुव म्हात्रे, वैष्णवी जाधव यांसारख्या कलाकारांनी आपल्या उत्कृष्ट रांगोळ्यांद्वारे प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि दिवाळीच्या निमित्ताने नागरिकांना रांगोळी कलेचा आनंद लुटता यावा या उद्देशाने हे प्रदर्शन भरवण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. प्रदर्शनाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून मोठ्या संख्येने रसिक रांगोळी कला पाहण्यासाठी येत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: