उरण (विशेष प्रतिनिधी) -विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सर्वत्र सुरू असताना उरण विधानसभा मतदारसंघातील दीर्घकालीन समस्या मात्र अद्यापही अनुत्तरित आहेत. या परिसरात दोन लाख कोटींची विकास कामे झाल्याचा दावा केला जात असला तरी मूलभूत सुविधांच्या अभावामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
उरण, पनवेल व खालापूर या तीन तालुक्यांनी मिळून बनलेल्या या औद्योगिक मतदारसंघात रोजगार, आरोग्य, शिक्षण, क्रीडा मैदाने आणि पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई यांसारख्या अनेक समस्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. या समस्यांवर कोणतीही ठोस उपाययोजना झालेली नाही.
मतदारसंघात ओएनजीसी तेल शुद्धीकरण प्रकल्प, जेएनपीटी बंदर, वायू विद्युत केंद्र, भारत पेट्रोलियमचा घरगुती वायू भरणा प्रकल्प यांसारखे मोठे उद्योग असूनही स्थानिकांना रोजगाराची संधी मिळत नाही. उलट, अनेक उद्योग बंद पडल्याने हजारो कामगार बेरोजगार झाले आहेत.
मतदारसंघात एकही सुसज्ज रुग्णालय नसल्याने नागरिकांना पनवेल व नवी मुंबई येथील महानगरपालिकेच्या रुग्णालयांवर अवलंबून राहावे लागत आहे. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रेही अनेक समस्यांनी ग्रासली आहेत.
रसायनी येथील एक अभियांत्रिकी महाविद्यालय वगळता उच्च शिक्षणाची सोय नसल्याने विद्यार्थ्यांना मुंबई, नवी मुंबई किंवा पनवेल येथे जावे लागत आहे. नागरिकांसाठी मनोरंजनाची साधने, सिनेमागृहे आणि नाट्यगृहेही उपलब्ध नाहीत. राष्ट्रीय पातळीवरील खेळाडूंसाठी मैदानेही नाहीत.
राज्यात २००९ मध्ये पुनर्रचित झालेल्या या मतदारसंघात चौथ्यांदा मतदान होत आहे. या वेळी नागरी समस्या सोडवण्यात अपयशी ठरलेल्या पक्ष आणि नेत्यांना मतदार धारेवर धरणार असल्याचे दिसत आहे. समस्यांचे निराकरण करणाऱ्या उमेदवारालाच मतदान करण्याची भूमिका नागरिक व्यक्त करत आहेत.
नव्याने सुरू झालेला सागरी अटलसेतू, उरण-नेरूळ लोकल आणि अलिबाग-विरार कॉरिडॉर या प्रकल्पांमुळे दळणवळणाचे जाळे विस्तारले असले तरी गाव व पाड्यांना जोडणारे मार्ग अद्यापही दुरवस्थेत आहेत. अनेक पाड्यांपर्यंत पोहोचण्यासाठी रस्त्यांचीही प्रतीक्षा आहे.
या निवडणुकीत येथील मतदार कोणत्या पक्षाला व उमेदवाराला संधी देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पार्श्वभूमी:
- तीन तालुक्यांचा संमिश्र मतदारसंघ
- हजारो कोटींची औद्योगिक गुंतवणूक
- सिडकोमार्फत विस्तारत असलेली नागरी वस्ती
- मुंबई-नवी मुंबई या महानगरांच्या मध्यवर्ती स्थान
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: