चिंचवड : "महाराष्ट्र चुकीला माफी करतो, पण गद्दारांना कधीच क्षमा करत नाही. महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारी ही लढाई आहे," असे प्रतिपादन शिरूर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.
वाकड येथे महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे यांच्या प्रचार मोहिमेच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. ग्रामदैवत म्हातोबा मंदिरात नारळ फोडून प्रचाराची सुरुवात करण्यात आली.
"छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांनी महाराष्ट्र धर्मासाठी बलिदान दिले. आज दिल्लीकर हाच महाराष्ट्र धर्म संपवण्याचा प्रयत्न करत आहेत," असे कोल्हे म्हणाले.
शिवसेनेचे संपर्क प्रमुख सचिन अहिर यांनी राहुल कलाटे यांना विजयी करण्याची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगितले. राहुल कलाटे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी टाकलेला विश्वास सार्थ करण्याची ग्वाही दिली.
या वेळी काढण्यात आलेल्या पदयात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला. हलगी, तुतारी, ताशांच्या गजरात निघालेल्या पदयात्रेचे फटाक्यांच्या आतिषबाजीत जागोजागी स्वागत करण्यात आले. तुषार कामठे, इम्रान शेख, संजोग वाघेरे यांच्यासह अनेक नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: