पुणे : कसबा मतदारसंघात आज महायुतीचा विजयसंकल्प मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्यात महायुतीच्या विजयासाठी तसेच राज्यात महायुतीची सत्ता प्रस्थापित करण्याचा निर्धार करण्यात आला. महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित वज्रमूठ बांधत कसबा मतदारसंघात जोमाने काम करण्याची प्रतिज्ञा केली.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष धीरज घाटे म्हणाले की, "कसबा मतदारसंघात एकवटलेली महायुतीची ताकद पाहून आमचे उमेदवार हेमंत रासने विजयी होतील याची खात्री आहे. कसबा मतदारसंघातून लोकसभेच्या मताधिक्यापेक्षाही मोठा लीड मिळेल असा विश्वास आहे. जनतेचा पाठिंबा मिळाल्यास, विधानभवनात कसब्याचा प्रतिनिधी पाठवून लोककल्याणकारी सरकार स्थापन करण्यासाठी नागरिक उत्सुक आहेत."
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर म्हणाले, "हेमंत रासने हे शांत आणि संयमी नेते असून गेल्या १८ महिन्यांमध्ये त्यांनी नागरिकांसाठी केलेले कार्य कौतुकास्पद आहे. पराभवानंतरही त्यांनी दुप्पट जोमाने सेवा केली आहे, त्यामुळे कसब्यातील जनता त्यांना विधानसभेत पाठवेल अशी खात्री आहे."
या विजयसंकल्प मेळाव्याला भाजपचे माजी राष्ट्रीय महामंत्री सी.टी. रवीजी, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख सुदर्शना त्रिगुणाईत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते रुपाली पाटील ठोंबरे, तसेच रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) अध्यक्ष संजय सोनावणे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मेळाव्यात सर्वांनी एकमुखाने महायुतीच्या विजयासाठी एकत्र येण्याचा निर्धार व्यक्त केला.
Reviewed by ANN news network
on
११/०८/२०२४ ०८:२१:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: