विरोधकांच्या पंचसूत्री घोषणा केवळ चुनावी जुमला - पवार
पिंपरी : विधानसभा निवडणुकीकडे गांभीर्याने पाहण्याचे आवाहन करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका मताने सरकार बदलू शकते असे सांगितले. काळभोरनगर, आकुर्डी येथे झालेल्या महायुती मेळाव्यात ते बोलत होते.
"१९९९ मध्ये एका खासदारामुळे वाजपेयी सरकार कोसळले. प्रत्येक मत महत्त्वाचे असून कोणीही गाफील राहू नये," असे पवार यांनी स्पष्ट केले.
आमदार अण्णा बनसोडे यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीचा उल्लेख केला. कोरोना काळात बनसोडे यांनी केलेल्या २५ लाख रुपयांच्या निधी मदतीचाही उल्लेख त्यांनी केला.
विरोधकांवर टीका करताना पवार म्हणाले, "महिलांना तीन हजार रुपये देण्याची घोषणा हा केवळ चुनावी जुमला आहे. आमच्या योजनांमागे नियोजनबद्ध विचार आहे."
शहराच्या विकासासंदर्भात बोलताना त्यांनी टाटा धरणातून पाणी आणणे, रिंग रोड, मेट्रो विस्तार आणि रमाई स्मारक अशा नव्या प्रकल्पांची माहिती दिली. महाराष्ट्र विदेशी गुंतवणुकीत देशात अग्रेसर असल्याचेही त्यांनी सांगितले.
महायुतीमध्ये विविध समाज घटकांना दिलेल्या ४४% जागांचा उल्लेख करत पुरोगामी महाराष्ट्राच्या निर्मितीचा आपला ध्यास असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.
मेळाव्यास विधान परिषद सदस्य अमित गोरखे, उमा खापरे यांच्यासह अनेक नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.
Reviewed by ANN news network
on
११/०९/२०२४ ०१:५४:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: